वसई: चाकूचा धाक दाखवुन जबरी चोरी करणार्या पारधी टोळीतील कुख्यात फरार आरोपीला २१ वर्षानंतर जालना जिल्ह्यातून अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे.९ जानेवारी २००३ रोजी आगाशी येथील सुहास पाटोळे याचे साई कुटीर या बंद बंगल्याचे तळमजल्यावरील खिडकीचे ग्रील तोडून चोरी करण्यात आली होती. तसेच जवळील अंतोन डाबरे याच्या बंद घरातही चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात आरोपी सुचिनाथ ऊर्फ राजेश पवार याला सन २००५ मध्ये अटक करुन त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले होते. परंतु गुन्ह्यातील फरार आरोपी बबर्या उर्फ बाबुराव काळे, बाबुरावचा मित्र आणि श्याम काळे यांचे गुन्ह्याच्या तपासात परिपूर्ण नांव, पत्ता निष्पन्न झाले नव्हते. वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर व संवेदनशील गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्याचे आदेश केले होते. हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने फरार आरोपी यांचा यापूर्वी सर्वोतोपरी शोध घेऊन देखील ते गेल्या २१ वर्षापासून मिळुन येत नव्हते. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी राहुल राख यांनी सपोनि दत्तात्रय सरक, पोहवा. शिवाजी पाटील, महेश वेल्हे, हनुमंत सूर्यवंशी, साकेत माघाडे, नितीन राठोड असे तपास पथक तयार केले होते.या पथकाने गुन्ह्याची माहिती घेऊन गेल्या २ महिन्यांपासून सतत अहोरात्र मेहनत घेवून तपासात सातत्य ठेवून आरोपीची माहिती घेतली. आरोपी बाबुराव काळे हा त्याचे राहते गावी असल्याचे कळले. या पोलीस पथकाने आरोपीच्या मूळ गावी जावून बातमीदार व आरोपीचे मोबाईल फोनच्या तांत्रीक विश्लेषणावरून तो त्याच्या गांवातील शेतातील घरात राहत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा लावून आरोपी बाबुराव काळे ऊर्फ बबर्या (५५) याला १९ डिसेंबरला सव्वा बारा वाजता शिताफिने ताब्यात घेतले.
Accused Arrested :फरार आरोपीला २१ वर्षानंतर अटक
written By My Mahanagar Team
vasai