घरफोडी चोरी करणार्‍या आरोपींना अटक

त्यावेळी आरोपी हबीब हाफिज सैफी हा राहत असलेल्या परिसरात २ दिवस वेशभूषा बदलून सापळा रचण्यात आला.त्यानंतर आरोपी हबीबला १२ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली.

भाईंदर :- काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरात कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत भर दुपारी घरफोडी करण्यात आली होती. त्या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास करून उत्तरप्रदेश येथून तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपीकडून चोरी गेलेल्या पैकी ८ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काशिमिरा येथील न्यू श्री. गणेशकृपा सोसायटी, अमर पॅलेस येथे राहणारे प्रविण दिगंबर शेटये हे त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी हॉल बघण्यासाठी ५ नोव्हेंबर २०२२ रोजी गेले असता दुपारच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातील ७ लाख ३५ हजार ००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि २ लाख रुपये रोख रक्कम असा ९ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी घरफोडी चोरी करुन नेला होता. त्याबाबत काशीमीरा पोलीस ठाण्यात कलम ४५४, ३८०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सपोनि प्रशांत गांगुर्डे व त्यांचे पथकाने तपास सुरू केला. तपास करत असताना आरोपीने गाझीयाबाद व दिल्ली या ठिकाणाहून येऊन गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ यांच्या परवानगीने काशिमिरा पोलीस ठाण्याचे पथक गाजियाबाद याठिकाणी गेले. त्यावेळी आरोपी हबीब हाफिज सैफी हा राहत असलेल्या परिसरात २ दिवस वेशभूषा बदलून सापळा रचण्यात आला.त्यानंतर आरोपी हबीबला १२ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली.

पोलीस कोठडी दरम्यान आरोपीने या गुन्ह्यात त्याचे साथीदार रमेश ऊर्फ कालु बैसाखीराम राजपूत व अकबर सुलतान सैफी दोन्ही (रा. नवी दिल्ली) असल्याचे सांगितले. तेव्हा आरोपी रमेश ऊर्फ कालु वैसाखीराम राजपुत यास शाहदरा, नवी दिल्ली परिसरात ४ दिवस सापळा रचून १९ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्हयातील चोरुन नेलेला मुद्देमाल आरोपीत रमेश राजपूत याने त्याच्या परिचयाचा इसम दादासाहेब ऊर्फ पिंटू रामचंद्र मोहिते यांच्याकडे वितळवण्यासाठी दिलेले २२० ग्रॅम. (२२ तोळे) वजनाचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.
चोरीस गेलेल्या ९ लाख ३५ हजार रुपयांच्या मुद्देमालापैकी आरोपीकडून २२० ग्रॅम. (२२ तोळे) वजनाचे ७ लक्ष ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व १ लाख ३३ हजार ५०० रुपये रोख रक्कम असा ८ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही चोरी करताना आरोपींनी कोणताही पुरावा मागे न ठेवलेला नसताना देखील गुन्हा दाखल झाल्यापासून सलग १३ दिवस दिल्ली व उत्तरप्रदेश येथे वेशभूषा बदलून सापळा रचून पोलिसांनी आरोपींना अटक करून गुन्हयातील मालमत्ता जप्त केली आहे.