पालघर: जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा पालघरतर्फे १ ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहतूक चालकांवर दीड महिन्यात कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. दीड महिन्याच्या कालावधीत 4 हजार 285 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये 3 हजार 355 जणांनी दहा लाख 65 हजार 900 रुपये दंडाची रक्कम भरली आहे. 856 वाहन चालकांकडून पाच लाख चार हजार एकशे पन्नास रुपये दंडाची रक्कम वसूल करायची बाकी आहे. तर 74 जणांवर न्यायालयात केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अवैध प्रवासी वाहतूक करणार्या 15 वाहन चालकांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर कोर्टात केस दाखल करण्यात आी आहे. असे वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आसिफ बेग यांनी सांगितले.यामध्ये 18 लाख 25 हजार 150 रुपयांचा विक्रमी दंड आकारल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.
त्याचबरोबर ड्रिंक अँड ड्राईव्हच्या 49 केसेस दाखल करण्यात आल्या. वाहनांच्या अपघातात जिल्ह्यांमध्ये अनेक जणांना जीव गमवावे लागले आहेत. या दृष्टीने वाहतूक शाखेने बेदरकारपणे वाहन चालवणार्या वाहन चालकांना शिस्त लागावी या दृष्टीने ठिकठिकाणी तपासणी नाके उभारून चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ड्रिंक्स अँड ड्राईव्ह अन्वये 49 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पार्टीमध्ये मद्यपान केले जाते. त्यानंतर घरी परतताना गाडी चालवून ड्रिंक अँड ड्राईव्हचे नियमाचे उल्लंघन केले जाते. स्वतःसह इतरांच्या जीवासाठीही धोकादायक असते पालघर जिल्ह्यातही ड्रिंक अँड ड्राइव्हचे नियम आहेत याची खबरदारी वाहन चालकांना यापुढे घ्यावी लागणार आहे.