मनोर: अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाला मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील आवंढाणी गावच्या हद्दीतील हॉटेल अक्सा शेजारच्या अमन ढाब्याच्या आवारामध्ये टँकरमधून डिझेल सदृश्य पेट्रोलियम पदार्थाची अवैधरित्या साठवणूक आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. दक्षता पथकाने पालघर जिल्ह्यातील पुरवठा निरीक्षकांना साथीला घेत सोमवारी रात्री आवंढाणी हॉटेल अक्सा लगतच्या अमन ढाब्याच्या आवारामध्ये छापा टाकला होता. पथकातील कर्मचार्यांनी ढाब्याच्या आवारात उभा असलेल्या एका टेम्पोची पाहणी केली. टेम्पोमध्ये डिझल सदृश द्रव्य साठवणूक केलेल्या दोन टाक्या आढळून आल्या.दोन्ही टाक्यांमधील द्रव्य पदार्थांची मोजणी केली असता एका टाकीमध्ये अंदाजे 600 लिटर व दुसर्या टाकीत अंदाजे 900 लिटर डिझेल सदृश्य पेट्रालियम द्रव पदार्थांचा साठा आढळून आला.
टेम्पोच्या कॅबिनमधील डिस्पॅसिंग युनिटला एक नोझल जोडून ठेवल्याचे आढळून आले. डिस्पेंसिंग युनिटला जोडलेला प्लास्टीकचा पाईप टेम्पोमधून शेजारी उभ्या असलेल्या टँकरच्या कप्प्याला जोडलेला दिसून आला. टँकरमधील द्रव्य साठा खाली करण्याकरीता असलेल्या मेन व्हॉल्वला जोडल्याचे आढळले.टँकरमधील डिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थाबाबत कोणतेही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. टँकरमधील साठ्याची मोजदाद केली असता त्यामध्ये अंदाजे बाराशे लिटर साठा असल्याचे आढळून आले. घटनास्थळावरून जप्त केलेला पेट्रोलियम पदार्थांचा साठा,एक टेम्पो आणि दोन तीन टँकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
घेतलेल्या नमुन्यांची तपासणी
पालघरच्या तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक तानाजी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात आरोपी विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थ कोणत्या पदार्थापासून बनलेला आहे.याबाबतची खातरजमा करण्यासाठी घेतलेले नमुने तपासणीसाठी कलिना स्थित न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. कार्यालयीन कामकाजाकरीता काही नमुने राज्यस्तरीय दक्षता पथकाच्या कर्मचार्यांच्या ताब्यात देण्यात आले.