केळवा रोडमध्ये अनधिकृत चाळीवर कारवाई

पालघर तालुक्यातील केळवा रोड स्थानकाच्या पूर्व पश्चिम भागातील आदिवासी व सरकारी जागेवर बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या चाळी गेल्या आठवड्यात जमीनदोस्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.

पालघर तालुक्यातील केळवा रोड स्थानकाच्या पूर्व पश्चिम भागातील आदिवासी व सरकारी जागेवर बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या चाळी गेल्या आठवड्यात जमीनदोस्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. त्या स्थगित मोहिमेला मंगळवारी पुन्हा सुरुवात करून तहसीलदार सुनील शिंदे यांनी पाचशेच्यावर खोल्या जमीनदोस्त केल्या असून पालघर तहसीलदारांच्या या धडक मोहिमेमुळे चाळ माफियांचे धाबे दणाणले आहेत. एकंदर तीन हजार अनधिकृत खोल्याचे काम या भागात करण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. पश्चिम रेल्वेचे केळवा रोड स्थानकावरून मुंबईहून येणे व गुजरातकडे ये-जा करणे सहज शक्य होते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांकडून चाळी उभारण्यात आल्या आहेत. या बेकायदेशीर चाळी या आदिवासी व सरकारी जमीनवर असल्याने महसूल विभागाचे दुर्लक्ष होते. त्यामुळे स्थानिकांना हाताशी धरून तिथे सुमारे तीन हजाराच्यावर खोल्या बांधण्यात आल्या. अखेर महसूल विभागाने गेल्या बुधवारी देविपाडा येथील तीनशेच्यावर खोल्या तोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी पुन्हा देवीपाडा, भुताळमान येथील ७५० खोल्या जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या आहेत.

येथील स्थानिक भूमाफिया सूरज बटवा याचे नालासोपारा येथील बिल्डरांशी हितसंबंध असल्याने स्थानिक नागरिकांना पैशाचे अमिश दाखवून कमी दरात येथील जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम त्याने केल्याचे बोलले जाते. तसेच आर्थिक संगनमत करून ४ ते ५ लाखात परप्रांतीयांना खोल्या विकून त्यातूनही कमिशन काढण्याचे काम बटवा करत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कारवाई दरम्यान त्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. मात्र सफाळे पोलिसांनी योग्य ती पाऊले उचलून तोडक कारवाई सुरूच ठेवली.

आदिवासी नागरिकांच्या जमिनीची विक्री होत नसल्याने स्टॅम्प पेपर अथवा साठे कराराच्या माध्यमातून विक्री करार करून आदिवासी बांधवांकडून कवडीमोल भावात जमिनी खरेदी केल्या जात आहेत. हा व्यवहार बेकायदेशीर करत असताना अशिक्षितपणामुळे खरेदीचा व्यवहार सुरू करण्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या त्या अनुषंगाने अधिकृत चाळीवर कारवाई करावी, यासाठी अहवाल पाठवण्यात आला होता. यावेळी सफाळे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, हेड कॉन्स्टेबल महेंद्र शर्मा व मोरे, शेळके, सातपुते यांच्यासह मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.

हेही वाचा –

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून दिलासा; एनसीबीने दिली क्लीनचिट