घरपालघरपालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

Subscribe

पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याननंतर मंगळवारी पोटनिवडणूकीसाठी मतदान होत आहे. ६२६ मतदान केंद्रात मतदान होणार असून बुधवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याननंतर मंगळवारी पोटनिवडणूकीसाठी मतदान होत आहे. ६२६ मतदान केंद्रात मतदान होणार असून बुधवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या १५ आणि पंचायत समितीच्या १४ जागांसाठी १४४ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. काही अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात उतरले आहेत. एकूण ३ लाख ६७ हजार ६९८ नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ लाख ८० हजार ९१५ स्त्रिया व १ लाख ८६ हजार ६९३ पुरुषांचा समावेश आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या कार्यालयात लगबग सुरू झाली असून कोणत्या गटात कोणता उमेदवार देणार, कोणाचे पारडे जड, कोण बाजी मारणार, कोण पडणार, कोण किती मते मिळवणार या विषयांवर भरभरून चर्चा सुरू झाली होती. अनेक उमेदवारांना पक्षाच्या निर्णयापुढे आपली इच्छा असूनसुद्धा उमेदवारीला मुकावे लागले आहे. तर काहींनी उमेदवारी न मिळाल्यामुळे दुसऱ्या पक्षातून मैदानात उतरावे लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऊन-पावसात उमेदवार कानाकोपऱ्यात चिखल-माती तुडवत जाऊन प्रचार करताना पहायला मिळाले. आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वपक्षीय बड्या नेत्यांनी प्रचार दौरे करत अनेक आश्वासने देऊन मते आपल्या उमेदवाराच्या पदरात पडण्याचा प्रयत्न केला आहे. तर एरवी शांत असलेले पक्षीय कार्यकर्ते जनतेसमोर येऊन आपल्या उमेदवारासाठी मत मागताना पहायला मिळाले. एकूणच सर्वच उमेदवारांचे भवितव्य हे मतदारच ठरवणार असून मंगळवारी ईव्हीएम यंत्रात उमेदवारांचे नशीब कैद होणार आहे. बुधवारी मतमोजणीनंतर उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

- Advertisement -

१५ जिल्हा परिषद व १४ पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी एकूण ६२६ मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत. मंगळवारी पहाटे ७ वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. १५ जिल्हा परिषदेसाठी ७४ तर १४ पंचायत समितीसाठी ७० उमेदवारांचे भविष्य यंत्रात कैद होणार असून बुधवार, ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी एकूण ३ हजार ४५५ कर्मचारी तैनात झाले आहेत.त्याचबरोबर पोलिसही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत. यंदाची पोटनिवडणूक ही ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देणारी असल्यामुळे सध्या सर्वांचे लक्ष निवडणुकीने वेधले आहे.

  • १५ जिल्हा परिषद – ७४ उमेदवार
  • १४ पंचायत समिती – ७० उमेदवार
  • एकूण ३ लाख ६७ जाहीर ६०८ मतदार
  • १ लाख ८० हजार ९१५ स्त्रिया तर
  • १ लाख ८६ हजार ६९३ पुरुष
  • जिल्ह्यात एकूण ६२६ मतदान केंद्र
  • निवडणुकीसाठी 3 हजार ४५५ कर्मचारी तैनात
  • मतमोजणी – बुधवार ६ ऑक्टोबर

खासदार राजेंद्र गावीत यांची प्रतिष्ठा पणाला

खासदार राजेंद्र गावीत यांनी वणई जिल्हा परिषद गटातून आपले चिरंजीव रोहित गावीत यांना मैदानात उतरवून राजकीय वारसदार तयार करण्यास घेतले आहे. या गटातून यापूर्वी निवडून आलेले शिवसेनेचे नेते माजी कृषी सभापती सुशील चुरी इच्छुक होते. हा गट पूर्वी ओबीसीसाठी राखीव होता. त्यामुळे ओबीसी समाजातीलच स्थानिक उमेदवार द्यावा, अशीही मागणी केली जात होती. असे असतानाही डावलून राजेंद्र गावीत यांनी मुलासाठी उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे शिवसेनेती मोठा गट प्रचंड नाराज झाला आहे. त्याचबरोबर रोहित गावीत परका उमेदवार असल्याचीही मतदारांमध्ये भावना निर्माण झाली आहे. गावितांविरोधात शिवसेनेत असंतोष असतानाच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपमध्येही गावितांविरोधकांनी रोहित गावितांच्या पराभवासाठी मोर्चेबांधणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथील लढत गावितांसाठी प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरली आहे.

- Advertisement -

वाडा तालुक्यातील पाच जिल्हा परिषद आणि एका पंचायत समितीच्या जागेकरता मतदान होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाडा येथील पी. जे. हायस्कूल येथे मतदान प्रक्रियेत लागणारे साहित्य वाटप करणे व मत मोजणीसाठी भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भवानजी आगे पाटील यांच्या निरीक्षणाखाली तालुक्यात एकूण १७० मतदान केंद्रांवर ६८० मतदान अधिकारी, १७० शिपाई , १७० पोलीस कर्मचारी, २० विभागीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली. मतदान प्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी पोलीस प्रशासनासह इतरही कर्मचारी व अधिकारी सज्ज झाले आहेत.

(कुणाल लाडे – हे डहाणूतील वार्ताहर आहेत.)

हेही वाचा –

टीका झाली तरी चालेल, पण लोकांना खोटा धीर देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -