भाईंदर :- मीरा- भाईंदर पालिकेतील नगरसेवकांची मुदत २८ ऑगस्ट २०२२ रोजी संपुष्टात आली आहे. तेव्हापासून महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्तांची नेमणूक झाली आहे. नगरसेवकांची मुदत संपून एक वर्ष झाले तरी आजही बहुतांश माजी नगरसेवक हे स्वतःला ‘नगरसेवक’ व ‘मा.नगरसेवक’ असे म्हणून घेत आहेत. महापालिकेच्या लेटरहेडचाही अधिकार नसताना वापर करताना दिसत आहे. तसेच त्यांच्या वाहनावर देखील नगरसेवक असे लिहिलेले असून वाहनावर महापालिकेचा लोगो देखील लावण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा संवैधानिक पदांचा गैरवापर करणार्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी मनसे मीरा- भाईंदर शहर अध्यक्ष हेमंत सावंत यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांनी ३ ऑक्टोबर २०२२ रोजी परिपत्रक काढून सर्व माजी नगरसेवकांना स्वतःला माजी नगरसेवक म्हणावे असे लेखी कळवले होते. याकडे दुर्लक्ष करत पद जाऊन वर्ष झाले, तरी स्वतः चा दरारा रुबाब दाखवण्यासाठी अनेक माजी नगरसेवक हे आजही स्वतःला नगरसेवक वा सभापती म्हणवतात. शिवाय माजी नगरसेवक असे स्पष्ट न लिहिता मा. नगरसेवक असे लिहून लोकांची दिशाभूल करत आहेत. इतकेच काय तर पालिकेच्या लेटरहेडचाही अधिकार नसताना वापर करताना दिसून येत आहेत. तसेच त्यांच्या वाहनांवर नगरसेवक व महापालिकेचा लोगोचा वापर करत शहरात फिरत आहेत. अनेक माजी नगरसेवक तर गेल्या वेळेस निवडून आलेले नाहीत. त्याअगोदर निवडून आलेले आहेत. तरीही ते महापालिकेच्या लोगोचा वापर करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे.