वसईः पेल्हार येथे बेकायदा बांधकामाची भिंत कोसळून मजूराचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेने त्या प्रभागातील अनधिकृत बांधकामांला जबाबदार धरत ठेका अभियंता ओम वगळ यांना बडतर्फ केले आहे. मात्र, अनधिकृत बांधकामाची जबाबदारी असलेल्या सहाय्यक आयुक्तांसह संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी पेल्हार प्रभाग समितीमधील वाकणपाडा, चौधरी कंपाऊंडमध्ये सुरु असलेल्या अनधिकृत गाळ्याची भिंत कोसळून एका मजूराचा मृत्यू झाला होता. तर पाच मजूर जखमी झाले होते. त्यानंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने या प्रभागात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांची सर्व जबाबदारी ठेका अभियंता ओम वगळ यांच्यावर टाकून त्यांनाच सेवेतून बडतर्फ केले आहे. अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणावर लक्ष ठेऊन वेळीच त्यावर कारवाई न केल्याने अनधिकृत बांधकामांना आपणच अप्रत्यक्षरित्या जबाबदार आहात.
जबाबदारीची गंभीरपणे दखल न घेता अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास अक्षम्य दिरंगाई केली असून सदरचे कृत्य कार्यालयीन शिस्तीला धरून नाही. सबब अनधिकृत बांधकामप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचे दिसून येत असल्याने कमी करण्यात आल्याचे प्रभारी आयुक्त रमेश मनाले यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.दरम्यान, अनधिकृत बांधकामांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, कर्मचार्यांसह ठेका अभियंत्यांवर टाकण्यात आलेली आहे. असे असताना महापालिकेने ठेका अभियंत्यांवरच कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे अधिकार एकट्या ठेका अभियंत्यांचे नाहीत. अनधिकृत बांधकामांना विविध राजकीय पक्षांसह महापालिका अधिकार्यांचा वरदहस्त असतो. यात अनेकांचे आर्थिक हितसंबंध असल्याने कोणताही ठेका अभियंत्यावर कारवाई करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण, अनधिकृत बांधकामामुळे एका मजूराचा मृत्यू झाल्याने प्रकरण अंगलट येऊ नये यासाठीच ठेका अभियंत्याचा बळी देऊन प्रशासनाने आपले हात झटकल्याचा आरोप केला जात आहे.