सर्वधर्मीय दफनभूमीविरोधात आंदोलन

वसई - विरार महापालिकेने दिवाणमान येथे आराखड्यात आरक्षित असलेल्या जागेवर सर्वधर्मीय दफनभूमीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे.

वसईः वसईतील दिवाणमान येथे वसई – विरार महापालिकेने सुरु केलेल्या सर्वधर्मीय दफनभूमीला विरोध करत सकल हिंदू समाजाच्यावतीने दफनभूमीच्या जागेवर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दफनभूमीची संरक्षण भिंत पाडण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण तापले होते. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
वसई – विरार महापालिकेच्या विकास आराखड्यात दिवाणमान येथील जागेत दफनभूमीचा समावेश नाही. सदरची जागा वेटलँड असून त्याठिकाणी बांधकाम करता येत नाही. हरित लवादाकडे याचिकेवर ३१ मार्चला सुनावणी होणार असल्याने बांधकाम करता येत नाही. मुंबई हायकोर्टाच्या मंजुरीशिवाय कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये, असे आक्षेप घेत सकल हिंदू समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वसई – विरार महापालिकेच्या अधिकार्‍यांनी २४ फेब्रुवारीला आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आपली बाजू मांडली होती. वसई – विरार महापालिकेने दिवाणमान येथे आराखड्यात आरक्षित असलेल्या जागेवर सर्वधर्मीय दफनभूमीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे.

त्यासाठी 4 कोटी १४ लाख ७७ हजार रुपये खर्च होणार आहेत. सध्या संरक्षण भिंत आणि माती भरावाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच दफनभूमीमधील अंतर्गत रस्ते आणि भिंतीचे काम सुरु करण्यात आले आहे. दफनभूमीचा निर्णय झाल्यानंतर सदर प्रकरणी हरित लवादाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर हरित लवादाने पर्यावरण विभागाची परवानगी घेऊन महापालिकेने कामाला सुरुवात केली आहे, असे महापालिकेच्यावतीने आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांना बैठकीत सांगण्यात आले होते. पण, सकल हिंदू समाजाने महापालिकेचा दावा अमान्य करत रविवारी दफनभूमीच्या जागेवर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी संरक्षण भिंत पाडण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण तापले होते. राजेश पाल, प्रशांत धामणकर, हरिकेश तिवारी, हितेश कुमार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. याआंदोलनाला भाजपच्या वसई विरारमधील पदाधिकार्‍यांनीही भाग घेतला होता.