पालघरः पालघर जिल्ह्यातून जाणार्या आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेन प्रकल्पात तलासरी तालुक्यातील आमगाव येथील आदिवासी महिला जेठीबाई काचरा यांची जमीन गेलेली असून प्रकल्पग्रस्ताचा मोबदला अधिकार्यांनी स्वतः गिळंकृत केल्याचा आरोप करून, न्याय मिळेपर्यंत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जेठीबाई यांचे कोर्टात दोन दावे प्रलंबित असतानाही सामनेवाले यांच्या खात्यात वर्ग करून जेठीबाई यांच्या हिस्साचे पैसे हे प्राधिकरणाचे अधिकारी भगवानजी पाटील आणि बुलेट ट्रेन प्रकल्प अधिकारी सचिन तोडकर यांनी खाल्ले असल्याचा आरोप जेठीबाई काचरा यांनी केला आहे. तोडकर यांनी मी तुला पंधरा लाख देतो तू कोर्ट केस मागे घे असे आमिष दाखवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप उपोषणकर्त्या जेठीबाई यांनी केला आहे. न्याय मिळत नाही तोपर्यंत माझे आमरण उपोषण सुरूच राहणार असून मी मेली तरी चालेल पण माझ्या वडिलोपार्जित जमिनीचा मोबदला दुसर्याला खाऊ देणार नाही.”असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
उपोषणकर्त्या जेठीबाई यांना विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन प्रशासकीय अधिकारी आणि दलालांकडून त्यांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप मावनाधिकार मिशनचे राज्य प्रभारी हरबन्स सिंग यांनी केला आहे.
०००
माझ्या वडिलांच्या जमिनीचे पैसे अधिकार्यांनी परस्पर खाल्ले असल्याने आमरण उपोषणास बसली आहे. मला न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही.
–जेठीबाई काचरा, उपोषणकर्ती
०००
त्या महिलेचे नाव सातबार्यावर नाही. बहिण लग्न होऊन सासरी गेली असून, भावाच्या नावावर सातबारा असल्याने, भावाला मोबदला देण्यात आला आहे. हक्क सिद्ध करील तेव्हा तिला मोबदला दिला जाईल.
— गोविंद बोडके, जिल्हाधिकारी, पालघर