घरपालघरखासदार राजेंद्र गावितांना धोक्याची घंटा!

खासदार राजेंद्र गावितांना धोक्याची घंटा!

Subscribe

जिल्हा परिषदेच्या निकालाने खासदार राजेंद्र गावितांना धोक्याचा इशारा दिला आहे. पुत्र प्रेमापोटी मुलाला राजकारणात उतरवण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. स्वतःच्या राजकीय सोयीसाठी सतत पक्ष बदलत असलेल्या गावितांना हा निकाल भविष्यात राजकीय अडचणींचा ठरण्याचीच शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या निकालाने खासदार राजेंद्र गावितांना धोक्याचा इशारा दिला आहे. पुत्र प्रेमापोटी मुलाला राजकारणात उतरवण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. स्वतःच्या राजकीय सोयीसाठी सतत पक्ष बदलत असलेल्या गावितांना हा निकाल भविष्यात राजकीय अडचणींचा ठरण्याचीच शक्यता वर्तवण्यात येत आहे. खासदार गावितांनी आपला मुलगा रोहित गावीत यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरवून पालघरच्या राजकारणात आणण्याचा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे दस्तुरखुद्द शिवसेनेतच असंतोष खदखदत होता. त्यातच सुशील चुरींसारख्या नेत्याला डावलून स्वतःच्या मुलाला तिकीट मिळवून गावितांनी मोठी चूक केली. चुरी यांनी जिल्हा परिषदेत सभापती म्हणून काम केले आहे.

डहाणू परिसरात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ओबीसीमुळे त्यांना जागा गमवावी लागली होती. पोटनिवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळेल, अशीच चुरी यांची अपेक्षा होती. पण, गावितांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून चुरींचा गेम केला. पण, या डावपेचाच्या राजकारणात गावितांच्या मुलाचाच राजकीय गेम झाला. एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत स्थानिकांची नाराजी व्यक्त केली होती. पण, खासदार गावितांनी शिंदेंच्या माध्यमातूनच स्थानिकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः शिंदे यांनीही निवडणुक प्रचारात भाग घेत गावितांच्या बाजूने कौल दिला होता.

- Advertisement -

काँग्रेसच्या तिकीटावर पालघर विधानसभा निवडणुक जिंकल्यानंतर गावितांची राजकीय स्वप्नेही वाढली. गावितांना नशिबानेही साथ दिली. काँग्रेस सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. मग गावितांनी भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभेत उडी घेतली. भाजपच्या तिकीटावर २०१८ च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावितांचा विजय झाला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाली. तेव्हा युतीच्या अंतर्गत समझौत्यामध्ये गावितांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकीटावर गावित पुन्हा एकदा लोकसभेत पोचले. असे असले तरी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावितांचे नेतृत्व अद्यापही मान्य केले जात नाही, हे रोहित गावितांच्या पराभवाने दाखवून दिले आहे. पालघर लोकसभेसह बोईसर, पालघर, डहाणू, विक्रमगड विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बिगर आदिवासी पुढाऱ्यांना राजकारण्यात खूपच मर्यादा आल्या आहेत. त्यातच गावीत परके असल्याची भावना त्यांच्यासह स्थानिक आदिवासी नेत्यांमध्येही आहे. इतकेच नाही तर गावितांच्या कार्यपद्धतीवरही शिवसेनेसह सर्वच थरात नाराजीचा सूर दिसून येतो.

रोहित गावीत यांचे मीरा भाईंदर शहरातील मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदणी झालेली आहे. त्यातून नाव कमी करण्याचा अर्ज देत रोहित गावितांचे पालघरमधील मतदार यादीत नाव टाकण्यात आल्याबद्दलही खासदार राजेंद्र गावीत यांच्यावर टिका होत आहे. एकतर स्वतः राजेंद्र गावीत मीरारोड येथे राहतात. मुलगाही तिथेच राहतो. फक्त राजकीय सोयीसाठी गावितांनी पालघरमध्ये भाड्याने बंगला घेतला आहे. लोकप्रतिनिधी इतक्या दूरवर राहतो, हेही स्थानिकांच्या पचनी पडत नाहीये. महत्वाची बाब म्हणजे गावित शिवसेनेचे खासदार असले तरी शिवसैनिकांना ते अद्यापही आपलेसे वाटत नाहीत, हेही सत्य आहे. गावित माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटचे मानले जात असल्यानेच कदाचित शिवसैनिकांचा दुरावा असल्याचेही सांगितले जाते. या आणि अशा अनेक कारणांनी रोहित गावित तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाऊन त्यांचा दारूण पराभव झाला. जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ झालेली असताना रोहित गावितांना झालेला पराभव राजेंद्र गावितांसाठी धोक्याची घंटा मानली जाते.

- Advertisement -

हेही वाचा –

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ३६५ कोटी मंजूर, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

खासदार राजेंद्र गावितांना धोक्याची घंटा!
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -