महावितरणविरोधात ११ मे रोजी सर्वपक्षीयांचे धरणे आंदोलन

मोखाडा तालुक्यामध्ये मोखाडा उपकेंद्रावरून खोडाळा पंचक्रोशीतील गाव-पाड्यांना विद्युत पुरवठा करताना अनंत अडचणी येत होत्या.

मोखाडा तालुक्यामध्ये मोखाडा उपकेंद्रावरून खोडाळा पंचक्रोशीतील गाव-पाड्यांना विद्युत पुरवठा करताना अनंत अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी केंद्र शासनाच्या दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत १६ कोटी ९५ लाख रुपये खर्च करून महावितरण विभागाने मे. हायटेक इलेक्टिफिकेशन इंजिनिअर्स प्रा. लि. या कंपनीमार्फत खोडाळा येथे स्वतंत्र उपकेंद्र उभारण्यात आले आहे. मात्र या कामात अनेक त्रुटी असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे खोडाळा पंचक्रोशीला भरपावसात विजेचा लपंडाव झेलावा लागणार आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने खोडाळा पंचक्रोशीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले असून बुधवार, ११ मे रोजी महावितरणच्या पालघर अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. त्यामुळे येथील निकृष्ट कामाचा प्रश्न अधिकपणे चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अंदाज पत्रकाप्रमाणे मूळ वाहिनी खंडित होऊ नये, झाल्यास तातडीने दुरुस्ती व्हावी, यासाठी राज्यमार्गाला समांतर वीजवाहिनी वाहून आणण्याची अंदाजपात्राकीय तरतूद असताना देखील मधल्या मार्गाने जंगलातून वाहिन्या खेचण्यात आल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी विद्युत खांब हे व्यवस्थित न पुरल्याने खांब हे केव्हाही कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. विद्युत वाहिन्या या बऱ्याच ठिकाणी ताणून खेचलेल्या नसल्याने जमिनीशी स्पर्धा करत आहेत. या वाहिन्या हवेमुळे एकमेकांना चिकटून बऱ्याचदा विद्युत पुरवठा खंडीत करण्यास कारणीभूत ठरत आहेत. तर वादळी वाऱ्यात त्यामुळे विद्युत पुरवठा दिर्घकाळ खंडीत होण्याची दाट शक्यता आहे. अशा असंख्य त्रुटी असल्याने खोडाळा उपकेंद्र म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा ठरले. पर्यायाने महावितरण कर्मचारी आणि ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा –

भोंग्यांचा विषय फक्त एक दिवसाचा नाही, आंदोलन सुरुच राहणार, राज ठाकरे भूमिकेवर ठाम