घरपालघरमीरा-भाईंदरमध्ये मराठा सर्वेक्षण योग्यरित्या न केल्याचा आरोप

मीरा-भाईंदरमध्ये मराठा सर्वेक्षण योग्यरित्या न केल्याचा आरोप

Subscribe

मीरा- भाईंदरमधील सकल मराठा समाजाकडून केला जात आहे. सर्वेक्षण योग्य झाले नसल्याने फेरसर्वेक्षणाची मागणी मराठा समाजाने केली आहे.

भाईंदर :- मीरा-भाईंदर महापालिकेने शहरात मराठा समाजासह सर्व खुल्या वर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. परंतु हे सर्वेक्षण करण्यासाठी नेमलेले कर्मचारी मोबाईल अँप वापरण्याचे किंवा इतर काही गोष्टीचे ज्ञान नसल्यामुळे अनेकांचे सर्वेक्षण झाले नाही. अनेकांचे सर्वेक्षण करताना फक्त नावे लिहून घेतली व स्वतः माहिती भरली आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण बरोबर झाले नसल्याचा आरोप मीरा- भाईंदरमधील सकल मराठा समाजाकडून केला जात आहे. सर्वेक्षण योग्य झाले नसल्याने फेरसर्वेक्षणाची मागणी मराठा समाजाने केली आहे.

मराठा आणि खुल्या वर्गातील कुटुंबीयांचे सर्वेक्षण २३ जानेवारीपासून राज्यात सुरू करण्यात आले. त्यानुसार मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी या कामासाठी नोडल अधिकारी म्हणून उपायुक्त मारुती गायकवाड यांची नियुक्ती केली. या सर्वेक्षणासाठी महापालिकेने जवळपास ५०० ते ५५० कर्मचारी नेमले होते. कर्मचारी नेमताना त्यांना सर्वेक्षणाचे ज्ञान असणे आवश्यक होते. परंतु नियुक्त केलेल्या अनेक कर्मचार्‍यांना मोबाईल अँप वापरता येत नसल्याचा आरोप होत आहे. शासनाने वेळ कमी दिल्यामुळे देखील सर्वेक्षण घाई घाई मध्ये करण्यात आले. अनेक भागात शेवटच्या दिवशी कर्मचार्‍यांनी नागरिकांची फक्त नावे लिहून घेतली व नंतर स्वतः माहिती भरली,अशी देखील चर्चा आहे. ज्या ठिकाणी मराठा समाज मोठ्या प्रमाणात राहत आहेत त्या ठिकाणी देखील जसे काशीमीरा व पेणकरपाडा भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षणच केले नाही. तरीही महापालिकेने २ लाख ४० हजार घरांना भेट दिली असल्याचा दावा केला आहे. यामध्ये २७ हजार घरे बंद होती. तर १० हजार घरातील कुटुंबीयांनी माहिती दिली नाही, असे सांगितले असून ९८.२० टक्के सर्वेक्षण झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया,

मीरा- भाईंदर शहरात मराठा समाजाचे सर्वेक्षण पूर्णपणे झाले नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास अडचण होऊ शकते. कर्मचार्‍यांनी अनेक भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षणच केले नाही. केवळ नावे घेऊन स्वतः ऍपमध्ये माहिती भरली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे शासनाकडे चुकीची माहिती जाणार आहे. त्यामुळे महापालिकेसह शासन आणि आयोगास तक्रार करून फेरसर्वेक्षणाची मागणी केली जाणार आहे.

- Advertisement -

– सुभाष काशिद, सकल मराठा समाज , समन्वयक

सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या अनेक कर्मचार्‍यांनी सर्वेक्षणात कामचुकारपणा केला किंवा जाणीवपूर्वक सर्वेक्षण प्रामाणिकपणे केले नसल्याचे दिसून येते. सर्वेक्षणात माहितीच योग्य पद्धतीने भरली गेली नाही. त्याचा परिणाम मराठा समाजाला आरक्षण मिळण्यावर होऊ शकतो.

-सुरेश दळवी ,अध्यक्ष, मीरा-भाईंदर मराठा संघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -