मोखाडा: महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मोखाडा तालुक्यातील लाभार्थ्यांना स्वतःचा फिरता व्यवसाय करता यावा यासाठी ई -वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय यांसाठी पाठिंबा देण्यात येत आहे. यासाठी फिरती विक्री केंद्र या मंजुरी पत्राचे वाटप आमदार सुनिल भुसारा यांच्याकडून करण्यात आले.संपूर्ण मतदारसंघातील अनेक तरुणांना व्यवसायातून समृद्धी मिळण्यासाठी अशा अनेक वाहनांचे वाटप आमदार भुसारा यांच्या प्रयत्नाने करण्यात आले आहे.मोखाडा तालुक्यातील यावेळी ५ लाभार्थ्यांना वाहनांचे वाटप झाले. यावेळी नगराध्यक्ष अमोल पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे,नगरसेवक प्रमोद कोठेकर, अमजद अन्सारी, भाजप तालुका अध्यक्ष विठ्ठल चोथे, काँग्रेस तालुका अध्यक्ष जमशीद शेख, माजी उपसभापती बशीर अन्सारी आदी सर्वपक्षीय मंडळी यावेळी उपस्थित होती.
तसेच मोखाडा तालुक्यातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, कर्मवीर हायस्कूल तसेच हुतात्मा स्मारक आदी ठिकाणी सर्व ग्रामस्थ नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले. त्यानंतर सर्वपक्षीय मंडळीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. आजच्या तरुणांनी व्यवसायाकडेही लक्ष द्यायला हवे, असे आवाहन यावेळी भुसारा यांनी केले.या वाहनांसाठी शहरी आणि ग्रामीण लाभार्थी निकषानुसार अनुदान दिले जाते. शहरी भागातील लाभार्थ्यांना २० तर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी ३५ टक्के अनुदान अटी शर्थीनुसार देण्यात येते. यासाठीचे मोठे प्रयत्न भुसारा यांनी त्यांच्या मतदारसंघात केले. त्यानुसार अनेकांना अशी वाहने उपलब्ध होवून रोजगार मिळाला आहे.यावेळी लाभार्थ्यांनी आमदारांचे आभार मानले.