घरपालघरमंत्रालयावर धडकणार वाढवण बंदरविरोधी मोर्चा

मंत्रालयावर धडकणार वाढवण बंदरविरोधी मोर्चा

Subscribe

त्याकडे सरकार मुद्दामहून दुर्लक्ष करत असल्यामुळे बंदर विरोधी संघटना आता थेट मंत्रालयावरच मोर्चा घेऊन जाणार आहेत.

डहाणू : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वाढवण बंदराच्या बाजूनेच बोलत असल्याने पालघर जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. वाढवण बंदराविरोधात जिल्ह्यातील विविध मच्छीमार संघटनांसह इतर संघटनांनी मंत्रालयावर १७ नोव्हेंबरला धडक मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला असून त्यात माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेदेखील सहभागी होणार आहेत. त्याआधी जनजागृती करण्यासाठी देश तसेच राज्यातील महत्वाच्या गावांमध्ये बंदराविरोधात निदर्शने केली जाणार आहेत. पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिक पातळीवरून नेहमीच कडवा विरोध दर्शविण्यात येऊनसुध्दा सरकारने वाढवण बंदर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरुद्ध स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांनी पुन्हा एकदा एकत्रित होत कडवा विरोध दर्शवला आहे. मात्र त्याकडे सरकार मुद्दामहून दुर्लक्ष करत असल्यामुळे बंदर विरोधी संघटना आता थेट मंत्रालयावरच मोर्चा घेऊन जाणार आहेत.

ह्या मोर्चाचे आयोजन नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, भुमिसेना, आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहमीच वाढवण बंदर विरोधी भूमिका घेतली असून काही दिवसांआधी त्यांनी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या अध्यक्षांनी फोनद्वारे संवाद साधत शिवसेना नेहमीच वाढवण बंदर विरूध्द स्थानिकांसोबत असल्याची ग्वाही दिली होती. त्याअनुषंगाने येत्या गुरुवारी १७ नोव्हेंबर रोजी आयोजित चलो मंत्रालय म्हणत मुंबई मंत्रालयावर घेण्यात येणार्‍या धडक मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सहभागी व्हावे यासाठी मच्छीमार संघटनांकडून त्यांना निवेदन देण्यात आले आहे.

- Advertisement -

यावेळी उद्धव ठाकरे स्वतः मोर्चात सहभागी होतील असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिल्याची माहिती संघटनांच्या पदाधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे वाढवण बंदर विरोधी मोर्चाला अधिक बळ मिळणार असून, त्यामुळे सरकारला बंदराबाबत पुन्हा विचार करावा लागेल अशी शक्यता पदाधिकारी व्यक्त करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकापाठोपाठ एक असे दोन वेळा वाढवण बंदर होणार असल्याच्या घोषणा केल्यानंतर किनारपट्टीवरील भागात संतापाचे वातावरण पाहायला मिळाले असून, वाढवण बंदरविरोधी लढा अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले आहे. वाढवण बंदरविरोधी संघटनांनी एकत्र होत लढा अजून बळकट केला असून सतत निदर्शने सुरू केली आहेत. किनारपट्टी भगातील नागरिकांनी महाराष्ट्रासह देशातील विविध सार्वजनिक ठिकाणी दर्शनी भागात वाढवण बंदरविरोधी निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. तर, येत्या रविवार २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी वाढवण गावातून जेएनपीटी चलेजाव, गो बॅक जेएनपीटीचा नारा देत मच्छिमार्केट व मासेमारी बंद ठेऊन गावोगावी आंदोलने, निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतर गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा नेण्यात येणार आहे. त्या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती बंदर विरोधी संघटनांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -