घरपालघरबंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न

बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न

Subscribe

ज्वेलर्स दुकानात दिवसाढवळ्या घडलेला लुटमारीचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

भाईंदर : मीरारोड पूर्वेच्या जांगीड सर्कलजवळ असलेले कोठारी ज्वेलर्स बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. यावेळी दुकानमालकाने दरोडेखोरांचा सामना करत व हिंमत दाखवत दुकानात ठेवलेल्या काठीने त्यांना प्रतिकार केल्याने दुकान न लुटताच त्यांना खाली हाताने परत जावे लागले. ज्वेलर्स दुकानात दिवसाढवळ्या घडलेला लुटमारीचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मीरारोड पूर्वेच्या जांगीड सर्कलजवळ असलेले कोठारी ज्वेलर्स दुकानात दोन इसम तोंडाला माक्स लावून दुपारी चारच्या सुमारास दुकानात आले. त्यानंतर त्यांनी दुकान मालकाला सोन्याची अंगठी विकत घ्यायची आहे, असे सांगून चर्चा करू लागले. यावेळी ज्वेलर्स मालक मोहित कोठारी यांना संशय आला आणि त्यांनी ज्वेलर्सच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका इसमाने बॅगेतून बंदूक काढून बंदूक दाखवत सोने लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोहित यांनी आपल्या दुकानात असलेली लोखंडी काठी हातात घेऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या सोबत एकहाती लढा दिला आणि दरोडेखोरांना पळवून लावले. या दरोडेखोरांना सोने नाही पण मोबाईल चोरण्यात यश आले. दरोडेखोरांना दुकान मालकाने पळवून लावल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. मीरा -भाईंदर शहरात महिन्याभरात दुसरी घटना घडल्याने सोन्याच्या दुकानदारामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटना घडल्या नंतर लगेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. काशिमिरा गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. परिमंडळ एकचे उपायुक्त जयंत बजबळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. लवकरच या आरोपींना ताब्यात घेऊ अशी त्यांनी माहिती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -