घरपालघरअखेर कान्द्रेभुरे शाळेला ठोकले टाळे; संतप्त पालकांचा उद्रेक

अखेर कान्द्रेभुरे शाळेला ठोकले टाळे; संतप्त पालकांचा उद्रेक

Subscribe

गेल्या पाच वर्षांपासून शिक्षकांची मागणी करूनही अवघ्या एकच शिक्षिकेवर शाळेचा कारभार सोपवण्यात आल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी पालकांच्या मदतीने शाळेलाच टाळे ठोकल्याची घटना सफाळे जवळील कान्द्रेभुरे गावात घडली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून शिक्षकांची मागणी करूनही अवघ्या एकच शिक्षिकेवर शाळेचा कारभार सोपवण्यात आल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी पालकांच्या मदतीने शाळेलाच टाळे ठोकल्याची घटना सफाळे जवळील कान्द्रेभुरे गावात घडली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना खुद्द शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. असाच काहिसा प्रकार पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिमेकडील कान्द्रेभुरे या दुर्गम भागात घडला आहे. इयत्ता १ ली ते ७ वीचे वर्ग भरणाऱ्या जिल्हा परिषद कान्द्रेभुरे या शाळेत ६५ विद्यार्थी शिक्षण घेत असून अध्यापनासाठी चार शिक्षकांची आवश्यकता असतानाही पालघरच्या शिक्षण विभागाकडून गेल्या दोन वर्षापासून कायमस्वरूपी शिक्षक न दिला नाही. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र, केवळ काही महिन्यांसाठी तात्पुरते शिक्षक देवून शिक्षण विभागाने सोपस्कार पार पाडले.

शासनाकडे दीड वर्षापासून पत्रव्यवहार केला होता. मात्र आमची दखल घेतली नाही. शाळेवर संतोष पाटील शिक्षक म्हणून काम करत होते. मात्र त्यांच्या गैरकारभारामुळे आम्ही पालकांनी त्याच्यावर तक्रार अर्ज करून बदली केली आहे. मात्र त्या व्यतिरिक्त एकही कायमस्वरूपी शिक्षक दिला नाही. गेल्या दीड वर्षापासून जागृती चौधरी चौधरी एकटी शिक्षका या शाळेवर आहे. शिक्षक मिळावा यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र त्याची दखल घेतली नसल्याने शाळेला टाळे लावण्याची वेळ आली आहे. येत्या चार दिवसात शिक्षण विभागाने दखल घेतली नाही तर पालघर पंचायत समितीसमोर विद्यार्थ्यांना घेऊन पालकासह आंदोलन करावे लागेल.
– विष्णू पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष

- Advertisement -

गेल्या पाच वर्षांपासून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतःच्या बळावर शाळेची बाई न बनता आई बनून शिक्षणाची धुरा सांभाळणाऱ्या शिक्षिकेला शिक्षण विभागाकडून मिळणाऱ्या अन्यायकारक वागणुकीमुळे तिचे मानसिक खच्चीकरण होऊन मागील १० दिवसांपासून शाळेतच धरणे आंदोलन करावे लागले. यानंतरही शिक्षण विभागाला जाग न आल्याने गुरुवारी शाळा व्यवस्थापन समिती व संतप्त पालकांनी अखेर या शाळेला टाळे ठोकले आहे.

२०१२ मध्ये असाच प्रकार घडल्याने तेव्हाही शाळेला टाळे ठोकल्यावर पर्यायी शिक्षक देण्यात आले होते. दरम्यान, आमच्या शिक्षिका जागृती चौधरी गेल्या दहा दिवसांपासून २४ तास शाळेत धरणे आंदोलन करत आहेत. त्याची बाजू समजून घेण्यासाठी तरी प्रशासनाने थोडे लक्ष घालावे.
– तनुजा विजय पाटील, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, कान्द्रेभुरे

- Advertisement -

सफाळे पश्चिमेकडे मुख्य रस्त्याजवळील माकणे गावापासून ७ किलोमीटर असणाऱ्या कान्द्रेभुरे या दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इयत्ता १ ली ते ७ वीच्या वर्गांसाठी शाळा सुरू झाली. दुर्गम भाग असल्यामुळे नेहमीच या शाळेला शिक्षकांचा प्रश्न सतावतच होता. २०१२ मध्ये देखील कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने ग्रामस्थांनी या शाळेला टाळे ठोकले होते. दरम्यान, ५ वर्षांपूर्वी जागृती चौधरी या शिक्षिकेने शाळेची धुरा सांभाळली. सर्व समस्यांवर मात करून या शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिक्षण दिले. सोबतच शाळेच्या परिसराचा चेहरा मोहरा बदलत झाडा पानांनी नंदनवन फुलवले. शाळेला भेडसावणाऱ्या विविध समस्या त्यांनी सामाजिक संस्था आदींच्या मदतीने सोडवल्या. मात्र, शाळे व्यतिरिक्तही इतर शासकीय कामे सोपविले गेल्याने शिक्षिका जागृती चौधरी यांची दमछाक सुरू झाली. अशातच संतोष पाटील या कायमस्वरूपी शिक्षकाला दीड ते दोन वर्षांपूर्वी या शाळेतून तिघरे शाळेत पाठविण्यात आले. मात्र शाळेच्या पटावर आजही त्यांचे नाव कोरलेलेच आहे. शिक्षणाचा भार एकट्या शिक्षिकेवर आल्याने गावातील काही सुशिक्षित तरुण तरुणींनी पुढाकार घेऊन स्वयंसेवक म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम केले.

आम्ही सहा स्वयंसेवक असून शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवत आहोत. या शाळेला तात्पुरते शिक्षक पाठवतात. मात्र अधिकार नसल्याने कुठल्याही प्रकारे प्रशासकीय काम करत नाही. त्यामुळे शिक्षका जागृती चौधरी यांच्यावर शाळेचा भार येतो.
– दुर्गेश भोईर, स्वयंसेवक, कान्द्रेभुरे शाळा

शाळा व्यवस्थापन समितीने मागील दोन वर्षांपासून शाळेला पदवीधरसह अन्य शिक्षक उपलब्ध करून द्यावा, ही वारंवार मागणी केली. परंतु शिक्षण विभागाने तात्पुरते शिक्षक दिले. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बेहद परिणाम होऊ लागला. दोन महिन्यांपूर्वी पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी चौधरी या दोन महिन्यांच्या रजेवर गेल्या. यादरम्यान तात्पुरता शिक्षक म्हणून अशोक काटकर या शिक्षकाला नेमण्यात आले होते. मात्र या शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण करणे, शाळेत झोपा काढणे, शाळेच्या आवारातील झाडांची नासधूस करणे, शाळेच्या स्वयंसेवकांना हाकलुन देणे, असे प्रकार करून शाळेचे उपक्रम देखील धोक्यात आणले. पालकांनी याबाबत रजेवर गेल्याने शिक्षिका जागृती चौधरी यांना घडलेली सारी हकीकत सांगितली. त्यानंतर या शिक्षिकेने १४ फेब्रुवारी रोजी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांना आपण शाळेत हजर राहणार असल्याचे लेखी पत्र दिले होते. या सर्व प्रकारानंतर हताश झालेल्या जागृती चौधरी यांनी मागील दहा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले असतानाही पालघर शिक्षण अधिकारी शाळेत फिरकलेच नसल्याचे पालकांनी सांगितले.

गटशिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून बीडीओ यासंदर्भात योग्य ते उपाययोजना करून लवकरच शाळेला शिक्षक देतील.
– लता सानप, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद पालघर

अखेर संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापन समिती व समस्त पालक वर्गाने २४ फेब्रुवारी रोजी शाळेला टाळे ठोकले. पुढील चार दिवसात शिक्षण अधिकाऱ्यांकडून कोणतेच पाऊल उचलले न गेल्यास पालघर पंचायत समिती कार्यालयासमोर याहीपेक्षा मोठ्या प्रमाणे आंदोलन करून दाद मागणार असल्याचे पालक वर्गातून सांगण्यात आले.

हेही वाचा –

12th Board Exam : बारावीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल, ५ आणि ७ मार्चचे पेपर पुढे ढकलले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -