जनावरांच्या मृत्यूची मालिका सुरुच, मृतांची संख्या २० वर; पशुपालकांची भरपाईची मागणी

खोडाळा परिसरातील जनावरांमध्ये अज्ञात आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून आतापर्यंत २० जनावरे या आजारापासून दगावली आहेत.

खोडाळा परिसरातील जनावरांमध्ये अज्ञात आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून आतापर्यंत २० जनावरे या आजारापासून दगावली आहेत. कालपर्यंत सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सावरपाडा, हट्टीपाडा, हुंड्याचीवाडी, बोरशेती व वाघ्याची वाडी या वाड्या-पाड्यांवर १५ जनावर दगावली होती. तर गुरुवारी जोगलवाडी येथील विलास भोरुंडे, युवराज मुकणे, देवराम मुकणे, काळूबाई सारकते व केशव सारकते यांचे प्रत्येकी औताचे बैल दगावले आहेत. प्रत्येक जनावरांची किंमत ५० ते ६० हजारांपर्यंत असून जनावर दगावल्यामुळे पशुपालकांवर मोठी कुर्‍हाड कोसळली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे.

माझा औताचा बैल दगावल्याने नुकसान झाले आहे. लसीकरण करूनही जनावरे दगावत असतील तर लसीकरण नक्की कोणत्या आजारावर केले जाते. कोविड काळात बैल दगावल्याने मोठा आर्थिक भुर्दंड बसला असून मृत्यू जनावरांचा पंचनामा करून भरपाई मिळावी.
– विलास भोरुंडे, पशुपालक, जोगलवाडी

दोन ते तीन दिवसांपूर्वी परिसरात जनावरे दगावत असल्यामुळे जोगलवाडी येथीलही जनावरांना लसीकरण करण्यात आले. परंतु, लसीकरण केलेली जनावरेसुद्धा दगावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विलास भोरुंडे यांचा औताचा असलेला बैल सकाळपर्यंत चारा, पाणी खात होता. परंतु, अचानक ३ ते ३.३० वाजता जनावर दगावले. त्याचेही लसीकरण झाल्याचे विलास भोरुंडे यांनी सांगितले. मोखाडा तालुक्यातील खोडाळा विभागातील हट्टीपाडा, सावरपाडा, हुंड्याचीवाडी या गावांतील गाय-बैल अशा तब्बल १५ जनावरांचा दोन ते तीन दिवसांतच मृत्यू झाला असून गुरुवारी पुन्हा पाच जनावरे दगावली आहेत. यात सर्व जनावरे मोठी आणि दुभत्या गायी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मात्र गुरांच्या मृत्युमुळे हळहळही व्यक्त होत आहे. साथीच्या आजारात गुरांना ताप येणे, गळ्याभोवती सूज येणे, पोट फुगणे ही लक्षणे असून अगदी एक-दोन दिवसातच यामुळे गुरांचा मृत्यू होत आहे. यामुळे अशा साथीच्या आजारासाठी दरवर्षी आजाराआधीच लसीकरण होणेही गरजेचे आहे.

खोडाळा परिसरात फर्‍यासदृश्य आजाराचा प्रादुर्भाव झाला असून त्यासंदर्भात ठराविक निदान झालेले नाही. त्यासाठी जिल्ह्यांतून एक टीम आली असून दगावल्याने जनावरांच्या मृत्यूचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
– पोटे, पशुसंवर्धन अधिकारी, मोखाडा

नुकसानग्रस्त पशुपालक व मृत जनावरांची संख्या –

१) निवृत्ती झुगरे – १ बैल
२) चंदर झुगरे – १ बैल
३) देवराम शिद – १ बैल
४) नरेश वारे – २ बैल
५) मंगा रेरे – १ गाय
६) देवराम धाऊ रेरे – १ गाय
७) शिडू रेरे – १ गाय
८) गोविंद झुगरे – १ बैल
९) भरत शिद – १ बैल
१०) लक्ष्मण रेरे – १ गाय
११) देवराम यसू रेरे – १ गाय
१२) दिनकर हडोंगे – १ गाय
१३) रामा झुगरे – १ गाय

हेही वाचा –

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचे 5708 नवे रुग्ण; 12 रुग्णांचा मृत्यू