घरपालघरउघड्या गटाराने अजून एक जीव गिळला, नालासोपार्‍यातील तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

उघड्या गटाराने अजून एक जीव गिळला, नालासोपार्‍यातील तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

ऋषभ हा आपल्या आई -वडील व लहान बहिणीसोबत राहत होता. तो जानेवारी महिन्यात परदेशात नोकरीसाठी जाणार होता. मात्र वडिलांना कर्करोग असल्याने त्यांच्या उपचारासाठी तो घरातून काम करत होता.

विरार : वसई -विरारमधील उघडी गटारे येथील नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत. कारण वसई-विरार पालिका हद्दीत महिनाभरात उघड्या गटारामुळे मृत्यू झाल्याची दुसरी घटना घडली आहे. नालासोपारा पूर्वेतील अग्रवाल नगर परिसरात उघड्या गटारात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऋषभ सरकार (२५) असे या तरुणाचे नाव असून रात्री घरी जात असताना ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. ७ नोव्हेंबर रोजी मंदिरात जात असताना उघड्या गटारात पडून ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल परिसरातील पार्वती अपार्टमेंट मध्ये राहणार्‍या ऋषभ सरकार (२५) याचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाला आहे. सोमवार २१ नोव्हेंबर रोजी ऋषभ कामानिमित्त दुपारी बाहेर गेला होता. रात्री घरी येताना पदपाथावरून चालत असताना अंधार असल्याने त्याला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा तोल जाऊन तो उघड्या गटारात पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. या संदर्भात आचोळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

ऋषभ हा आपल्या आई -वडील व लहान बहिणीसोबत राहत होता. तो जानेवारी महिन्यात परदेशात नोकरीसाठी जाणार होता. मात्र वडिलांना कर्करोग असल्याने त्यांच्या उपचारासाठी तो घरातून काम करत होता. पण त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गटारे, नाले उघडीच ठेवण्याच्या पालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे महिन्याभरात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

- Advertisement -

कोट

वसई-विरार महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने गटारात पडून एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला होता. महानगरपालिका नागरिकांकडून कर वसूल करते .मात्र नागरिकांच्या सुरक्षितेच्या बाबतीत काहीच विचार करत नाही . या घटनेची सखोल चौकशी करावी.

- Advertisement -

-मनोज बारोट , जिल्हा उपाध्यक्ष,भाजप
&………………………………………………..

बॉक्स

विरार पश्चिमेतील बोळींज नाका येथे भूमिगत वीज वाहक तारांसाठी महावितरण व पालिकेने निष्काळजीपणे रस्ता खोदून केबल टाकली होती. यात तनिष्का कांबळे या १५ वर्षीय तरुणीला विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला होता. ७ नोव्हेंबर रोजी विरार पश्चिमेच्या एमबी इस्टेट मध्ये राहणार्‍या कमलाबेन शहा (६८) यांचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -