कुपोषण समूळ नष्ट करण्यासाठी टास्क नेमा

या भागात टास्क फोर्स नेमला गेला पाहिजे व त्या माध्यमातून येथील कुपोषणाला आळा घातला जाऊ शकेल, असे बोलताना त्यांनी सांगितले.

ज्ञानेश्वर पालवे, मोखाडा: पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग आणि शेवटचे टोक असलेल्या मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम सावर्डे गावात दोन बालकांचा कुपोषणाने अवघ्या दहा दिवसांत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच खासदार राजेंद्र गावित यांनी सावर्डे येथे प्रत्यक्ष भेट कुटूंबांचे सांत्वन करत आर्थिक मदत केली व वस्तुस्थिती जाणून घेतली. कुपोषणाचे कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभाग ,आदिवासी विभाग, एकात्मिक आदिवासी विभाग या सर्व विभागाच्या माध्यमांतून या भागात टास्क फोर्स नेमला गेला पाहिजे व त्या माध्यमातून येथील कुपोषणाला आळा घातला जाऊ शकेल, असे बोलताना त्यांनी सांगितले.

तसेच अंगणवाडीतील मदतनीसाचे रिक्त असलेले त्याचबरोबर तालुक्यातील रिक्त पदे तात्काळ भरण्याच्या सूचना खासदार यांनी दिल्या. यावेळी मोखाडा तहसीलदार मयूर खेंगले, प्रभारी गट विकास अधिकारी कुलदीप जाधव, आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर, पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे, उपसभापती प्रदीप वाघ, भाजपचे मिलिंद झोले, हनुमंत पादिर तसेच सरपंच, उपसरपंच उपस्थित होते