भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत परवाना देताना खरोखरच एखाद्याच्या जीवाला धोका असल्यास स्व-संरक्षण व बँकांकरता सुरक्षेच्या हेतू शस्त्र परवाना देण्यात येतो. दोन वर्षात पोलीस आयुक्तलयामार्फत नव्याने २४ परवाने देण्यात आले आहेत. यामध्ये ५ शस्त्र परवाने बँकाना तर इतर स्व-संरक्षण व सेफ्टी याकरिता देण्यात आले आहेत. तसेच मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयांकडून एकूण ५५ जणांचे शस्त्र परवाना रद्द करण्यात आले असल्याची माहिती परवाना विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली आहे. परवाना रद्द करण्यात आलेल्यांमध्ये मयत व्यक्ती, वयोवृद्ध व्यक्ती आणि काही जणांवर गुन्हे दाखल असल्याने त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने १९५९ चा कायदा रद्द करून नवीन २०१६ चा कायदा केला आहे. या कायद्यानुसार परवान्याचे नुतनीकरण म्हणजेच नवीकरण असा अर्थ लावण्यात आला आहे. नुतनीकरण (रिनीव्हल) करताना परवाना देतानाची सर्व प्रक्रिया अवलंबण्यात येत असून त्यानुसार पोलीस आयुक्तांना परवानाधारकांची सर्व बाजूने तपासणी करण्याचे अधिकार आहेत. शस्त्र परवान्याचा गैरवापर करणार्यांच्या विरोधातही सक्तीने कारवाई करण्यात येत असून लोकांना शस्त्राची भीती दाखवणार्यांचाही परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी म्हटले आहे.
शस्त्र परवाना गरज कोणाला ?
विविध घटना, सामाजिक कार्य व माहिती अधिकार कार्यकर्ते यांना विविध प्रसंगातून जीवाला धोका निर्माण झालेल्या राजकीय व प्रभावशाली व्यक्तींना स्वसंरक्षणासाठी तसेच व्यापारी व उद्योजकांना मालमत्तेच्या संरक्षणासाठी पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आणि आता पोलीस आयुक्तालय कार्यालयांकडून शस्त्र परवाना देण्यात येतो. अशा व्यक्तींनी शस्त्र परवान्याची मागणी केल्यानंतर स्थानिक पोलीस व वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडून समांत्तर पद्धतीने चौकशी केली जाते. व्यक्तीला खरेच शस्त्राची गरज आहे, की नाही, हे सुद्धा तपासले जाते. त्यानंतर पोलीस आयुक्त शस्त्र परवाना मंजूर करतात. काही वर्षात अनेकांनी गरज नसताना परवाना घेतला असून शस्त्र घेऊन ते विविध ठिकाणी छाप पाडताना दिसतात असेही प्रकार समोर आलेले आहेत.