चोरटी वृक्षतोड करणार्‍या दोघांना अटक

पश्चिम वाडा परिक्षेत्र अधिकारी विकास लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची टीम सज्ज झाली.

वाडा:हरोसाळे गावाच्या जंगलात बुधवारी मोठी तोड होणार असल्याची खात्रीशीर बातमी वनविभागाला मिळाली असता शोधाशोध सुरु असताना वृक्षतोडीची चाहूल लागता पहाटेच्या सुमारास धाड टाकण्यात आली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपी फरार झाले. मात्र एका तस्करास पकडण्यात यश आले असून गुरुवारी अन्य एका आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. वाडा शहराच्या जवळ वनविकास महामंडळच्या कम्पार्टमेंट नंबर ५०७ मधे वृक्षतोडीची माहिती वनविभागाला मिळाली. पश्चिम वाडा परिक्षेत्र अधिकारी विकास लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची टीम सज्ज झाली.

पहाटे चार वाजताच्या सुमारास तोडीच्या ठिकाणी धाड टाकली असता ८ ते १० व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले मात्र एकाला पाठलाग करुन पकडण्यात यश आले. आरोपींनी तोडलेली वृक्ष व पिकअप टेम्पो असा एकूण पाच लाख रक्कमेचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे. नितीन मारुती वाघात, लक्ष्मण खरपडे अशी दोघा आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयात हजर केले असता कस्टडी सुनाविण्यात आली आहे. या कारवाईत वनपाल संभाजी पाटील, किशोर भोईर , वनरक्षक अशोक पाटील, सागर देशमुख, गणेश मोहिते , योगेश राऊत, विजय वळवी व वाघमारे सहभागी होते.