मोखाडा: तहसिलदार कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील गौण खनिजांच्या अवैध उत्खननावर लक्ष ठेवून तालुक्यांतून महसूल वसूल केला जातो. स्वस्त धान्य दुकानदार देखरेख ठेवणे व काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुध्दा तहसीलदारांना करावे लागते.विशेष म्हणजे तहसिलदार तालुका दंडाधिकारी म्हणून सुद्धा काम बघतात अशी महत्त्वाची भूमिका पार पाडणार्या पदावर मोखाड्यात सहा वर्षांत तब्बल एकोणीस तहसिलदारांनी काम पाहिले आहे.महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्याच्या अखत्यारीत येणारे जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व तालुक्यातील तहसिलदार ही शासकीय कार्यालयातील महत्त्वाची पद आहेत.तहसिलदार यांना तालुक्यातील जमीन महसूलाशिवाय पिकांची आणेवारी काढणे,ही जबाबदारी असते.आणेवारी नुसारच दुष्काळाची स्थिती जाणून घेण्याची घोषणा केली जाते.
त्यानंतर सरकारने नियमानुसार निश्चित केलेली नुकसान भरपाई शेतकर्यांपर्यंत पोचवणे, तालुक्यातून गौण खनिजांचे उत्खनन करण्यासाठी तहसिलदारांची परवानगी घ्यावी लागते तर बेकायदा गौण खनिज उत्खनन करणार्यांवर कार्यवाही देखील तहसिलदार करतात.त्याचप्रमाणे स्वस्त धान्य दुकानांवर देखरेख ठेवणे व काळाबाजार रोखणे यासह तालुका दंडाधिकारी म्हणून अर्ध न्यायिक कामकाज सुध्दा तहसिलदार यांना करावे लागत असून वेळप्रसंगी आरोपींना समन्स बजावणे, प्रसंगी अटक वॉरंट काढणे, दंड करणे यासह जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिनल आदी कागदपत्रे नागरिकांना वाटप करणे अशा अनेक जबाबदार्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे तहसिलदारांना तालुक्याच्या समस्या सोडविण्यासाठी जास्त काळ मिळाला तर तहसिलदार आपल्या पदाला चांगला प्रकारे न्याय देऊ शकतात.अन्यथा पाच सहा महिन्यांच्या काळात प्रशासनावर वचक निर्माण करुन प्रशासन सुरळीत चालविण्यासाठी अनेक अडचणी येत असतात असे असतानाही मोखाडा तालुक्यात मात्र ७ वर्षांत तब्बल १९ तहसिलदारांनी आपला पदभार सांभाळलेला आहे.