डहाणू : दिवाळी सण संपताच गाव खेड्यातील आदिवासी शेतकरी बांधव रब्बी हंगाम शेतीच्या मशागत करण्यास मग्न झाला आहे. गेल्यावर्षी प्रमाणे पाऊस या वर्षी लवकर गेल्याने दिवाळीचा सण संपताच शेतकरी बांधव आता रब्बी हंगामातील पिकाची मशागत करण्यास मग्न होऊन कामास जोमाने सुरुवात केली आहे. यामध्ये पूर्वी खेडोपाड्यात असलेला शेतकरी हा दिवाळी संपताच बाहेरगावी कामानिमित्त स्थलांतरित होत होता. मात्र गेल्या पाच वर्षांपासून आता आदिवासी समाजातील शेतकरी सुद्धा आधुनिक शेतीकडे वळला आह.े यामध्ये बहुतांश गाव खेड्यातील शेतकरी हा मिरची लागवड, गवार , त्यानंतर फळभाज्या , कडधान्य व इतर रब्बी हंगामातील पिके तसेच फुलशेती व इतर शेती करण्यास प्रयत्नशील झाला आहे. त्यामुळे यावर्षी दीपावलीचा सण संपताच शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहाने रब्बी हंगामातील पीक लागवड तयारी करण्यास मग्न झाला आहे. सध्या तरी विविध प्रकारच्या कृषी विभागातील खासगी कंपन्या आपल्या जाहिराती प्रसिद्ध करून विविध प्रकारचे शेतीचे उपक्रम राबवून खेड्यापाड्यातील शेतकर्यांना मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून त्यांना नवनवीन शेती तंत्रज्ञानाविषयी योग्य मार्गदर्शन करत असतात. तसेच रब्बी हंगामातील पीक घेण्यास प्रोत्साहित करत आहेत.
यामुळे आदिवासी भागातील कामगार माणसे दिवाळीच्या सणानंतर इतर बाहेरगावी कामानिमित्ताने स्थलांतरित व्हायचे ते प्रमाण आता शेतीमुळे कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. सध्या तरी डहाणू भागामध्ये खेडोपाडी विविध प्रकारची रब्बी हंगामातील पिके ही त्या त्या भौगोलिक स्थितीनुसार त्या त्या भागात घेण्यात येत आहेत. त्यामुळे येथील शेतकरी वर्गाचा शेती करण्याचा कल उत्साह वाढला आहे . शेतीतील येणारे पीक उत्पन्न हे मुंबई- अहमदाबाद महामार्गाला लागून असलेल्या चारोटी गाव येथे आठ ते दहा व्यापारी जागेवर येऊन खरेदी करत असल्याने डहाणू भागातील जवळ जवळच्या गावातील सर्व माल हा या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी विक्रीसाठी घेऊन येत असतात.
कोट.
पूर्वी आम्ही कामानिमित्त स्थलांतरित होऊन शहरात वीट भट्टी बांधकाम बिगारी किंवा इतर कामासाठी जात होतो. परंतु आता शासनाच्या विविध प्रकारच्या योजना या आमच्यासाठी राबवल्या जातात. त्या योजनांचा आम्ही आता योग्य तो वापर करून शेतीमध्ये लघु उद्योग धंदा करून स्थलांतरित न होता आमच्या शेत जागेत किंवा घरबसल्या धंदा करतो. त्यामुळे आमचा समाज बांधव आता खूप कमी प्रमाणात स्थलांतरित होत आहे.
– रवींद्र मुकणे , कातकरी समाज बांधव (शेतकरी).