बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाईल या कंपनीतील उत्पादनादरम्यान निघालेली प्रदूषित राख आणि घनकचरा बोईसरजवळील आदीवासी पाड्याजवळ साठवणूक केला जातो.या राखेच्या सततच्या साठवणुकीमुळे या ठिकाणी भलामोठा डोंगर तयार झाला असून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वार्याने ही घातक राख जवळच्या आदीवासी पाड्यातील थेट घरांमध्ये घुसत असल्याने रहिवाशी अक्षरक्ष: हैराण झाले आहेत. बेटेगाव ग्रामपंचायत हद्दीतील नवापाडा या आदीवासी पाड्यानजीक तारापूर औद्योगिक वसाहतीमधील विराज प्रोफाईल या कारखान्याने लोखंडावर प्रक्रिया करताना तयार होणारी राख,स्लज पावडर व इतर घातक घनकचर्याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी देताना ठरवून दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन करीत लाखो टन बेकायदेशीरपणे साठवणूक केली आहे.या ठिकाणी १०० फूट उंचीपेक्षा ही अधिक उंचीच्या राखेचा भलामोठा डोंगर तयार झाला आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात वेगवान वादळी वारे वाहत असून या वार्यामुळे हवेत उडालेली राख नवापाडयातील थेट घरांमध्ये घुसत आहे.घरांसोबतच आजूबाजूच्या शेतीमध्ये लावलेल्या फळझाडांचे आणि भाजीपाल्याचे या प्रदूषित राखेमुळे प्रचंड नुकसान होत असून नागरिकांसोबत वृद्ध व लहान मुलांच्या नाका-तोंडात आणि डोळ्यात ही घातक राख शिरत असल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.त्याचबरोबर बोईसर-महागाव रस्त्याने प्रवास करणार्या दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना या राखेमुळे प्रचंड त्रास होत असून जमीन व झाडाझुडापांवर राखेचे थर बसल्याने आजूबाजूचा संपूर्ण परिसर धुरकट झाला आहे.
जोरदार हवेसोबत उडालेली राख आजूबाजूच्या परिसरातील नवापाडा,झाडीपाडा आणि चुरीपाडा या आदीवासी वस्त्यांतील शेती,बागायती,घरे व अंगणातील झाडांवर पसरत असून यामुळे आदीवासी पाड्यातील शेतजमिनी नापीक झाल्या आहेत.त्याचसोबत विहिरी आणि कूपनलिकांसारखे पिण्याचे पाण्याचे स्त्रोत देखील प्रदूषित झाले आहेत.विराज प्रोफाईल कारखान्याने प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारे यंत्रणा कार्यान्वित केलेली नसल्याने या परिसरातील प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे.विराज प्रोफाईल कारखान्याकडून आदीवासी पाड्यानजिक प्रदूषीत राख व इतर घातक घनकचर्याच्या लाखो टन बेकायदा साठवणुकीमुळे होत असलेल्या प्रचंड त्रासाविरोधात गावकर्यांनी अनेक वेळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु आजपर्यंत त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नाही.
बेटेगाव नवापाडा येथील विराज कंपनीची राख साठवणार्या जागेची पाहणी करण्यात येईल.यामधून होणार्या प्रदूषण व त्याचा रहिवाशांना होणारा त्रास याबाबत संबंधित कंपनी दोषी आढळली तर नियमानुसार कारवाईसाठी तसा अहवाल बनवून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल.
– विरेंद्र सिंग,उप प्रादेशिक अधिकारी, म.प्र.नि. मं.तारापूर – २