भाईंदरः मीरा -भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या कार्यालयात चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने सोमवारी पहाटे पहार्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्यावर रॉडने मारहाण करून जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर आरोपी बेड्यांसह पसार झाला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जयकुमार राठोड गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपीला शोधण्यासाठी गुन्हे शाखेची विविध पथके कामाला लागली आहेत.
हैफल कालू अली (२७ वर्ष) या चोराला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सायकल व मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. त्याला मीरा रोड येथील मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या चौथ्या मजल्यावरील कार्यालयात बेड्यांसह ठेवण्यात आले होते. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पोलीस तैनात करण्यात आले होते. सोमवारी पहाटे बंदोबस्तासाठी असलेले एका पोलीस कर्मचारी जेवण आणण्यासाठी गेले असताना जयकुमार राठोड एकटेच होते. ती संधी साधून हैफल अलीने बेड्यांमधील एक हात बाहेर काढला. आणि जवळच असलेल्या लोखंडी रॉडने बेसावध असलेल्या जयकुमार राठोड यांच्या डोक्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर लगेचच हैफल कार्यालयातून बेड्यांसह पळून गेला. राठोड यांच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात हैफल अलीविरोधात खूनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेलचेल असलेल्या कार्यालयात घटना
हैफलला शोधण्यासाठी पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली असून पोलीस त्याचा माग काढत आहेत. हैफल हा नशेखोर होता. त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे हैफलला ठेवण्यात आलेल्या चार मजली इमारतीत दोन उपायुक्तांची कार्यालये आहेत. त्यामुळे पोलिसांची रेलचेल असलेल्या कार्यालयात अटकेत असलेला आरोपी जीवघेणा हल्ला करुन बेड्यासह पसार झाल्याने खळबळ उडाली आहे.