घरपालघरवन विभागाची जागा बळकावण्याचा प्रयत्न

वन विभागाची जागा बळकावण्याचा प्रयत्न

Subscribe

लोखंडी गेट लावून जागेवर कब्जा

पालघरच्या पूर्वेस सहाय्यक वनसंरक्षक कार्यालयासमोरच वनविभागातील कर्मचार्‍यांची निवासस्थाने असलेल्या जागेवर लोखंडी गेट बांधून अतिक्रमण करून कब्जा करण्यात आला आहे. त्याठिकाणी बोअरिंगही मारण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे वनसंरक्षकाच्या कार्यालयासमोरच वनखात्याची वीस गुंठे जमीन हडपण्याचा हा धक्कादायक प्रकार घडला असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पालघर नगरपरिषदेचे नगरसेवक तुषार भानुशाली यांच्या निवासस्थानाशेजारी असलेल्या गट क्रमांक १२५ अ पैकी ३ आणि १२५ अ पैकी ३,या जमिनीत अनेक वर्षांपासून वन विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांसाठी सरकारी निवासस्थाने बांधण्यात आली होती. त्यात अनेक वर्षे शासकीय वापर करण्यात आला आहे. सद्यस्थितीत येथील घरे मोडकळीस आल्याने कुणीही रहात नाही. पडीक स्थितीत असलेल्या या घरांकडे त्यामुळे कुणाचेही लक्ष नाही.

- Advertisement -

वनखात्याचे दुर्लक्ष झाल्याने आता त्यावर कब्जा करण्यास सुरुवात झाली आहे. जागेच्या मुख्य रस्त्यावर लोखंडी गेट लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. वीस गुंठे जागेवर बेकायदा कब्जा करणार्‍याने बोअरिंग मारून पाण्याची व्यवस्था केली आहे. संपूर्ण जागेवर कब्जा करण्यात आला असताना बीट वनरक्षक पंकज सनेर यांना या अतिक्रमणाची माहितीच नसल्याचे समोर आले आहे.

बाबत बीट कार्यालयात चौकशी केली असता तेथे उपस्थित असलेले वनरक्षक आंग्रे यांनी सांगितले की, लोखंडी गेटवर वन विभागाचे नाव लिहण्यात येणार आहे. याचा अर्थ हे अतिक्रमण कोणी केले आहे हे त्यांना माहित आहे. वन विभागाच्या सरकारी वास्तू असलेल्या जमिनीत विना परवानगी प्रवेश करून लोखंडी गेट लाऊन बोअरिंग मारण्याचे धाडस करून अतिक्रमण करणार्‍या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर चौकशी करून संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी. प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर कारवाई होऊ नये यासाठी ही कामे वनविभागानेच केली असल्याचा कांगावा वनखात्याकडून केला जाईल, असा आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी केला आहे. अतिक्रमण करणार्‍याविरोधात वन विभागाने फौजदारी कारवाई करून अतिक्रमण ताबडतोब दूर करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

वन विभागाच्या सरकारी सदनिका असलेल्या जमिनीबाबतचा कारभार वन परिक्षेत्र अधिकारी पाहतात. ते त्यावर कारवाई करतील.
– गजानन सानप,सहाय्यक वन संरक्षक,पालघर

गट क्रमांक १२५ अ पैकी ३ आणि १२५ अ पैकी ३,या जमिनीत अनेक वर्षांपासून वन विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांसाठी सरकारी सदनिका बांधण्यात आल्या आहेत. सध्या त्या राहण्यालायक नसल्याने तिथे कुणीही वास्तव्यास नाही. त्याठिकाणी अतिक्रमण झाल्याचे माहित नाही. गार्डना पाठवून कारवाई करायला सांगतो.
– वी.एस.पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी,पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -