पालघर: कायद्याच्या मोड करून वाढवण बंदर प्रकल्प स्थानिकांच्या माथी मारण्याच्या प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. महाकाय वाढवण बंदर हे स्थानिकांच्या अस्तित्वासाठी अती धोक्याची घंटा आहे. जर हे बंदर झाले तर स्थानिक भूमिपुत्र देशोधडीला लागेल, असे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे सचिव वैभव वझे यांनी ३ सप्टेंबर रोजी आयोजित होणार्या एल्गार सभेच्या अनुषंगाने पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. पालघर जिल्ह्यातील वादग्रस्त बंदर प्रकल्प असलेल्या वाढवणं बंदर विरोधात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने रविवारी ३ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी निषेध व्यक्त करण्यासाठी एल्गार सभेचे आयोजन केले आहे. त्या बाबत आज पालघर जिल्हा मच्छिमार सोसायटीच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. “आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन योग्यरीत्या झाले नाही.
येथील चिकू, आंबा, नारळीच्या बागा तसेच भोपळी मिरची, तिखट मिरची, लिली असे शेकडो टनाचे उत्पन्न घेणारे शेतकरी, बागायतदार नष्ट होणार आहेत. सुर्या प्रकल्पाचे पाणी या बंदारासाठी वळवले जाईल व उरले सुरले शेतकरी त्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत. समुद्रात टाकला जाणारा प्रचंड भराव व त्यापुढे असलेल्या कित्येक किलोमीटरच्या ब्रेकिंग वॉटर वॉल्स यामुळे गावागावातील खाडयांमधुन समुद्रातील प्रदूषित पाणी गावात घुसून त्याच्या आजुबाजुला असलेली शेतजमीनही निकृष्ट होणार आहे. या भरवासाठी दमण वरुन रेती आणली जाईल असे सांगितले जात आहे आणि सोबतीला आपल्या परिसरातील डोंगरांची दगड माती व शेतातील सुपीक माती घेतली जाईल ,असे समितीचे म्हणणे आहे. किंबहुना ते आजही आपल्या हक्कासाठी कोर्टाच्या पायर्या झिजवत आहेत. म्हणूनही आम्हाला वाढवण बंदर नकोच. त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या मायभूमीचे, कर्मभुमीचे रक्षण करण्यासाठी, आपली रोजी-रोटी वाचविण्यासाठी, आपले पारंपरिक व्यवसाय वाचविण्यासाठी आणि आपले हक्काचे घर वाचविण्यासाठी लोकशाही मार्गाने सज्ज राहण्याचे आवाहन वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला नारायण पाटील, रामकृष्ण तांडेल, ज्योती मेहेर, नारायण तांडेल, समिती सचिव वैभव वझे, स्वप्निल तरे, विजय मोरे, आणि इतर विरोधी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.