घरपालघरबालमाता पालघर जिल्ह्यातील कुपोषणाचे मूळ

बालमाता पालघर जिल्ह्यातील कुपोषणाचे मूळ

Subscribe

पालघर जिल्ह्यात जन्माला येणार्‍या मुलांपैकी ३० टक्के मुले ही कमी वजनाची असल्याने त्यांना पुढे कुपोषण व दुर्धर आजाराने ग्रासले जाते.

वसईः बालमाता हेच कुपोषणाचे मूळ आहे. किशोरवयात गरोदर राहिल्याने माता आणि जन्माला येणारी बालके कुपोषित होतात. त्यासाठी बालमाता होऊ नये यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत बिरसा मुंडा युवा मेळावे आयोजित करून शाळाबाह्य तसेच १४ ते १८ वयोगटातील तरुणींची नियमित आरोग्य तपासणी केली जाणार असून किशोरवयीन मुली गरोदर राहू नयेत यासाठी विशेष मोहिम हाती घेतली जाणार असल्याची माहिती पालघर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी दिली.

पालघर जिल्ह्यात जन्माला येणार्‍या मुलांपैकी ३० टक्के मुले ही कमी वजनाची असल्याने त्यांना पुढे कुपोषण व दुर्धर आजाराने ग्रासले जाते. त्यावर दीर्घकालीन उपाय म्हणून मातांना त्यांच्या तारुण्यातच सुदृढ करणे हे उद्दिष्ट ठेवून त्यांच्या जागृतीसाठी व निरंतर आरोग्य तपासणीच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागातर्फे दर तीन महिन्यांनी बिरसा मुंडा युवा मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. शाळाबाह्य कुमारी तसेच १४ ते १८ वयोगटातील तरुणींची सातत्याने आरोग्य तपासणी, १८ वर्षांपूर्वी गरोदर न राहण्याच्या दृष्टिकोनातून जागृती, समुपदेशन, त्यांना माहिती पुस्तिका व साहित्य वितरित करणे हा मेळाव्याचा हेतू आहे. यासाठी साडेपाच हजार युवकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. पालघर जिल्ह्यातील आठ लाख किशोरवयीन मुलींची आठ प्रवर्गांत विभागणी करून प्रत्येक तीन महिन्यांनी त्यांची आरोग्य तपासणी व आजार असल्यास त्यावर औषध उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. चौधरी यांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यामध्ये ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३०२ उपकेंद्र आहेत. मात्र, जिल्हा परिषदेकडे अतिदक्षता विभाग नाही. गंभीर रुग्णांना उपचार करण्यासाठी विविध आरोग्य संस्थांमध्ये न्यावे लागते. हे टाळण्यासाठी खासगी रुग्णालयांशी करार करून गरजू रुग्णांना विनामूल्य आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हयातील सुमारे १९ लाख नागरिक जन आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत. त्याच धर्तीवर रुग्णालयांशी करार करून रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न आहे, अशीही माहिती डॉ. चौधरी यांनी दिली.

 

- Advertisement -

२५ नोव्हेंबरपर्यंत सर्व पदभरती

पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सुमारे २८ वैद्यकीय अधिकार्‍यांच्या जागा रिक्त होत्या. त्या भरण्यासाठी दर गुरुवारी वैद्यकीय अधिकारी पदासाठी थेट मुलाखती पद्धत हाती घेतली जात असून येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत या सर्व पदांवर नियुक्त्या होतील, अशी माहिती डॉ. संतोष चौधरी यांनी दिली.

 

खासगी संस्थांची मदत

गंभीर रुग्णावरील उपचारावरील होणार्‍या खर्चासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. रुग्णवाहिकांची संख्या प्रमाणात असली तरी आवश्यकतेच्या वेळी रुग्णवाहिका न मिळाल्यास रुग्ण दगावण्याचे प्रकार घडत असतात. त्यासाठी खासगी रुग्णवाहिकेची मदत घेऊन गंभीर रुग्णांना वैद्यकीय सेवा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही चौधरी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -