घर पालघर आला नाही गुण,म्हणून केला भगताचा खून

आला नाही गुण,म्हणून केला भगताचा खून

Subscribe

त्यानंतर तपास केला असता संशयित विनोद उर्फ कांद्या महादू बसवंत (35) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात भिवा भगताच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला.

वसईः आर्थिक आणि कौटुंबिक विवंचनेत एखादा व्यक्ती कोणते पाऊल उचलेल याची काहीच शाश्वती नसते.याचेच उदाहरण वसईत पाहायला मिळाले आहे. बायको घरी येण्यासाठी भगताला दोन हजार रुपये देऊनही ती घरी न आल्याने संतापलेल्या नवर्‍याने वृध्द भगताची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वसईत उजेडात आला आहे. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी त्या नवर्‍याला अटक केली आहे. भिवा भिखा वायडा (वय 75) अशी हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या हत्येमागचे कारण धक्कादायक आहे. मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 मे रोजी एका जंगलात दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील वृद्ध व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता. तपासात हा मृतदेह गावातील वृध्द भिवा या भगताचा असल्याचे उजेडात आले. त्यानंतर तपास केला असता संशयित विनोद उर्फ कांद्या महादू बसवंत (35) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात भिवा भगताच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला.

उसगाव येथे राहणार्‍या विनोदची बायको भांडून तिच्या माहेरी निघून गेली होती. ती घरी परतत येत नसल्याने विनोदने तिला घरी आणण्यासाठी विधी करण्यासाठी दोन हजार रुपये भिवा भगताला दिले होते. पैसे देऊनही बायको घरी परत येत नसल्याने भगताने विधी केला नसल्याचा संशय विनोदच्या मनात होता. 25 मेच्या संध्याकाळी विनोदने दारु पिण्याच्या बहाण्याने भिवाला बोलावून जवळच्या जंगलात नेले. त्यानंतर बाचाबाची करून विनोदने भिवाला उसंगाव येथील देसाई वाडी बस स्टँडजवळ नेऊन त्याची सिमेंटच्या दगडाने ठेचून हत्या केली. मृतदेह हाती लागल्यानंतर तपासात उसगावातून विनोद बेपत्ता असल्याचे आढळून आले. या प्रकरणी मांडवी पोलिसांनी वेगवेगळी तीन पथके तयार करून मारेकर्‍याचा शोध घेतला. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यास सुरुवात केली होती. त्यात विनोद शिरसाड येथे असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विनोद सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याला खुनाच्या गुन्हयात पोलिसांनी अटक केली होती. कोरोनामुळे त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. हत्यारा विनोद हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी खुनाच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे त्याला सोडण्यात आले होते. सदर आरोपी हा गुन्हे प्रवृत्तीचा असल्याने त्याचे समाजात खुलेपणाने वावरणे सामाजिक हितासाठी धोक्याचे आहे. यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मांडवीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रफुल वाघ यांनी बोलताना सांगितले.

- Advertisement -

बॉक्स

वसई-विरार, मिरा-भाईंदर शहर आयुक्तालयाच्या क्षेत्रात गेल्या वर्षभरात 36 खुनाच्या घटनांची नोंद झाली आहे; तर 35 जबरी चोर्‍यांची नोंद झाली आहे. फक्त वसई-विरारमध्ये 29 खून आणि 23 जबरी चोरींची नोंद आहे. खून तसेच अनेकदा अमली पदार्थ तस्करी केली जात आहे. अशा गुन्हेगारांवर पोलिसांकडून कारवाईही केली जात आहे. त्यातच आपसातील मतभेद, क्षुल्लक वाद, जमिनीवरून होणार्‍या हाणामार्‍या यासह अन्य कारणाने हत्यारे उगारली जात आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -