पालघर: शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या जाणार असून जनतेने रोजगार हमी योजनेंतर्गत येणार्या प्रत्सेक योजनांचा लाभ घ्यावा. त्यासाठी गावातील प्रत्येक कुटूंब सक्षम करण्यास शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी व फलोज्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी विक्रमगड तालुक्यातील खोमारपाडा येथे आज केले.
या कार्यक्रमास खासदार डॉ.हेमंत सवरा, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार राजेंद्र गावित, मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार वर्मा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके,उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया जाधव, खोमारपाडा गावचे सरपंच विलास गहला आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी गोगावले म्हणाले की, पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. खोमारपाडा या छोट्याशा गावाने एक आदर्श निर्माण केला आहे. खोमारपाडा हे मॉडेल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात विविध योजना राबविण्यात येणार आहे. यावेळी मंत्री गोगावले यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विक्रमगड तालुक्यातील नंदादीप समृध्द गाव खोमारपाडा येथे केलेल्या विविध योजनांच्या कामाची पाहणी केली. तसेच विविध लाभार्थ्यांशी संवाद साधला. याठिकाणी गांडूळखत, मोगरा लागवड, शेततळे, बांबू लागवड अशा विविध योजना या ठिकाणी उत्तमरित्या राबविल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री गोगावले यांच्या हस्ते जलतारा या योजनेचे भूमीपूजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके प्रस्ताविकपर भाषणात म्हणाले की, या जिल्हयातील आदिवासींसाठी विविध योजना राबवून जीवनमान उंचविण्याचे काम केले आहे. विहिरी, रस्ते, शेततळे, बांबू उत्पादन, अशा विविध योजना राबविल्या आहेत. तसेच आदिवासी बांधवांना वनपट्टे वाटपात पालघर हा पहिला जिल्हा आहे. तसेच अशा विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकर्यांना लखपती करण्याचा शासनाचा मानस आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. शेवटी खोमारपाडा गावचे सरपंच विलास गहला यांनी आभार मानले.