भाईंदर : मालदीवमध्ये अडकलेल्या मन पारेख या तरूणाची सुटका करण्यात मीरा -भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयाच्या भरोसा सेलला यश आले आहे.भाईंदरमध्ये राहणारा मन पारेख (वय २४ वर्ष ) हा व्यवसायाने शेफ आहे. तो एजंटच्या माध्यमातून डिसेंबर २०२३ मध्ये नोकरीसाठी मालदीव येथील राहा रिसॉर्ट येथे गेला होता. दोन महिन्यांच्या नोकरीत मालदीव येथील रिसॉर्ट मालक आणितेथील जनरल मॅनेजर यांनी त्याच्याकडून १८ ते २० तास सतत काम करून घेतले.तसेच त्याला जेवण देखील नित्कृष्ठ दर्जाचे दिले जात होते. तेथील जेवणामुळे त्याला त्रास सुरू होऊन त्याची तब्बेत दिवसेंदिवस ढासळत चाललेली होती. मात्र त्या ठिकाणी राहत असलेल्या राहा रिसॉर्ट येथे चांगल्या सोयी सुविधा नसल्याने त्याने परत भारतात येण्याचे ठरवले. पंरतु हॉटेलचा मालक हा त्याला सोडायला तयार नव्हता.
पारेख याने नोकरीचे राजीनामा दिल्यानंतर देखील त्याला तेथून बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्याला भारतात आणण्यासाठी त्याची आई गेल्या सहा महिन्यांपासून पंतप्रधान कार्यालय, विदेश मंत्रालय, भारतीय दूतावास येथे पत्रव्यवहार करत होती. गेल्या दोन महिन्यांपासून त्या मुख्यमंत्री कार्यालय येथे प्रत्यक्ष भेटून त्यांना सतत पत्रव्यवहार करत होत्या. परंतु कुठूनही त्यांना सकारात्मक उत्तर मिळाले नाही. मन पारेख हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असून मागेल तितके पैसे रिसॉर्ट मालकाला देवून त्यांनी मुलगा मन यास परत भारतात पाठवण्याची मागणी केली होती. परतुं मालकाने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
शेवटी मीरा-भाईंदर,वसई विरार पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलकडे मन पारेख याच्या आईने रिसॉर्ट मालका विरोधात तक्रारी अर्ज दिला. सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना देवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय दूतावासाना संपर्क साधला असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मालदीव येथील राहा रिसॉर्टच्या जनरल मॅनेजर भारतात परत पाठवण्याची विनंती करण्यात आली होती. त्यास त्यांनी योग्य प्रतिसाद देत मन पारेख यास १७ नोव्हेंबरला भारतात पाठविण्याची तयारी दाखवली. मन पारेख हा भारतात सुखरूप परत आला आहे. सदरची कारवाई ही गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेल कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे, महिला पोलीस हवालदार भारती देशमुख, पोलीस शिपाई आफ्रिन जुन्नैदी, पूजा हांडे, अक्षय हासे, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान विजय घाडगे यांनी केली आहे.