भाईंदर : भाईंदर रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे पादचारी पुलावर एका वृद्ध महिलेला नवरा बायकोमधील भांडण सोडवण्यास मदत करा सांगून फसवणूक करत महिलेचे ७२ हजाराचे दागिने लंपास केल्याची घटना २ डिसेंबर रोजी घटना घडली होती. त्यानंतर २० डिसेंबर रोजी नवघर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर एका अनोळखी बोलबच्चन गँगमधील एक व्यक्ती आणि १२ वर्षांचा लहान मुलगा याने एका ७२ वर्षीय जयबुंनेसा अन्सारी वृद्ध महिलेला थांबवले. आम्हा नवरा बायकोमध्ये भांडण झाले आहे व तुम्ही माझ्या आईसारख्या आहात, भांडण सोडवण्यासाठी तुमचे दागिने देऊन मदत करा तिचा राग दागिने बघून शांत होईल असे सांगितले. विश्वास बसण्याकरता त्या महिलेच्या हातामध्ये नोटांचा बंडल ठेवल्याचे भासवून तो इसम दागिने घेऊन गेला व काही वेळाने रुमालात दागिने परत दिल्याचा बनाव केला आणि महिलेल्या दिलेल्या नोटांचे बंडल देखील तने परत घेतले नाही. त्यानंतर ती महिला आणि अनोळखी इसम आणि त्याच्या सोबत असणारा एक मुलगा दोघेही निघून गेले.
महिलेने कामावर गेल्यावर दुपारी जेवण करताना रुमाल उघडून दागिने बघितले असता त्या बोलबच्चन गँगने महिलेला भुरळ पाडून हातचलाखीने तिला परत केलेल्या रुमालात रेतीचे दगड ठेवून आणि नोटांच्या बंडलमध्ये फक्त पाचशे रुपयाची एक नोट देऊन फसवणूक केली असल्याचे समोर आले. याबाबत नवघर पोलीस स्टेशन येथे बोलबच्चन गँग विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष आहेर हे करत आहेत.