भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका शाळा या पूर्वी सातवीपर्यंत सुरु होत्या. काही शाळांमध्ये दोन वर्षांपूर्वी आठवी, नववी व दहावीचे वर्ग टप्प्या टप्प्याने वर्ग सुरु करण्यात आले. त्यानंतर दहावीच्या वर्गांना राज्य शिक्षण मंडळाची मान्यता नव्हती. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना खासगी शाळेच्या नावाने परिक्षेला बसवले जात होते. या शाळांना राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच पालिका शाळेतील विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला पालिकेच्याच नावाने बसता येणार आहे.
मीरा- भाईंदर महापालिकेच्या शहरात विविध माध्यमांच्या ३६ शाळा आहेत. यापूर्वी मनपा शाळांना माध्यमिक शाळेची परवानगी असल्यामुळे इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून दिले जात होते. सातवी झाल्यानंतर अनेक विद्यार्थी हे पुढील शिक्षण अर्धवट सोडून देत होते. तर काही विद्यार्थी हे खासगी शाळेत प्रवेश घेत होते. त्यामुळे दहावीपर्यंत वर्ग सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार आठवीचे वर्ग सुरू केले. नंतर पुढच्या वर्गात जाणार्या विद्यार्थ्यांसाठी महापालिका शाळेत नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून दहावीचे वर्ग सुरू होते. परंतु त्या वर्गाला राज्य शिक्षण मंडळाची मान्यता नव्हती. दहावीच्या परीक्षेला बसण्यासाठी शाळांना यु-डायस व इंडेक्सनंबर बंधनकारक आहे. मनपा शिक्षण विभागाने यु-डायस नंबर मिळवला होता. परंतु इंडेक्स नंबर मिळत नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत बसवण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे दोन वर्ष मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना खासगी शाळेच्या नावावर परीक्षा देण्यास बसवले होते. आता यावर्षी मनपा शिक्षण विभागाला यु-डायस व इंडेक्स हे दोन्ही नंबर मिळाल्यामुळे महापालिकेच्या नावाने विद्यार्थ्यांना बसता येणार आहे.