भाईंदर : मीरा -भाईंदरमधील यूएलसी घोटाळ्यात बनावट कागदपत्रे तयार करून शासनाचा महसूल बुडविल्यानंतर सीआरझेड बाधित जमिनीत असलेल्या कांदळवनाची कत्तल करून त्यावर बेकायदा माती भराव करत हरित पट्टा उध्वस्त केला होता. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात जागा मालक आणि बिल्डर मनोज मोटाजी पुरोहित यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ती जागा पूर्ववत करण्याची मागणी गो ग्रीन फाउंडेशन ट्रस्टने केली आहे.
मीरा -भाईंदर महानगरपालिका हद्दीत कांदळवन व मँग्रोव्ह झाडे आहेत. त्या भागात विकासकांनी जमिनी भूमिपुत्रांनाकडून खरेदी करून त्यावर असलेल्या कांदळवनाची कत्तल करून माती भराव करून पाणथळ व मँग्रोव्ह झाडे नष्ट केली आहेत. त्यावर अनधिकृत झोपड्या व बांधकामे केली आहेत. भाईंदर पूर्वेला मौजे नवघर हद्दीत इंद्रलोक भागात मौजे सर्व्हे क्रं. नवीन ३२ (जुना २४३) हिस्सा क्रं. ३ व १२ या जागेत मँग्रोव्ह झाडांची कत्तल झाली आहे. २०१८ साली जागेवर कांदळवन असल्याचा अहवाल वन परिक्षेत्र अधिकारी विभागाने दिला आहे. तर कांदळवन समितीच्या पाहणीमध्ये मौजे नवघर सर्व्हे क्रं. २४ व २६ व ३२ मध्ये माती व डेब्रिजची भरणी करून त्यात खाडी नाल्यालगत तिवरांची झाडांची कत्तल झाल्याचे दिसून आले . सर्व्हे क्रं. ३२ (२४३) मध्ये दगड खडीपासून वाळू तयार करणे, सिमेंटचे गट्टू बनविणे, काच बॉटलचे गोडाऊन, पत्र्याचे शेड व लोखंडी पत्र्याच्या झोपड्या बांधल्या आहेत. तसेच शौचालयाचे पक्के बांधकाम करून मलमूत्र थेट खाडीत सोडलेले वन विभागाच्या पाहणीत आढळले आहे. सदरील कांदळवन ह्रासाची तक्रार गो ग्रीन फाऊंडेशन ट्रस्टने शासनाकडे केली होती.
तरी मुंबई उच्च न्यायालयातील रिट याचिकाच्या अंतरीम आदेश व जनहित याचिकेमधील १९ सप्टेंबर २०१८ रोजीच्या अंतिम आदेशामध्ये दिलेल्या निर्देशानुसार कांदळवनापासून ५० मीटर अंतरात कोणतेही बांधकाम करण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही भरणी करून मँग्रोव्ह झाडांची कत्तल करून बांधकामे केल्याचे आढळले आहे. कांदळवन समितीच्या पाहणीत दिसून आलेल्या अहवालनुसार, जागामालक व बिल्डर मनोज मोटाजी पुरोहित व राकेश अग्रवाल आणि संजय म्हात्रे यांच्यावर मीरा- भाईंदरचे अपर तहसीलदार निलेश गौंड यांच्या आदेशावरून तलाठी तुषार खेडकर यांच्या फिर्यादी वरून पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५, १९ नुसार दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचा अधिक तपास नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संपत आहेर हे करत आहेत.
Edited By Roshan Chinchwalkar