भाईंदर : अल्पवयीन मुलीची छेड काढणार्या एका रिक्षावाल्याला नागरिकांनी चोप देऊन धिंड काढली. रविवारी संध्याकाळी मीरा रोडच्या काशिमिरा परिसरात ही घटना घडली.पीडित मुलगी १२ वर्षांची असून मीरा रोड परिसरात राहते. राजू वर्मा (३८) नावाचा रिक्षाचालक तिला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता. रविवार ५ जानेवारी रोजी संध्याकाळी ही मुलगी कामानिमित्ताने घराबाहेर गेली होती. त्यावेळी राजूने अश्लिल इशारे करत तिला सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी खुणावले. मुलीने लगेचच तेथून पळ काढला आणि घरी येऊन हा प्रकार सांगितला. या भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते अजय साळवी यांनी रिक्षावाल्याला रंगेहाथ पकडण्यासाठी पीडित मुलीला पुन्हा त्याच रस्त्याने जाण्यास सांगितले आणि सापळा लावला. मुलीला परत आलेले पाहून रिक्षाचालकाने पुन्हा अश्लिल इशारा केला. ते पाहून उपस्थित नागरिकांना त्याला रंगेहाथ पकडून बेदम चोप दिला आणि अर्धनग्न धिंड काढत काशिमीरा पोलीस ठाण्यात नेले. या मारहाणीची चित्रफित सध्या व्हायरल झाली आहे.
Bhayander News: मुलीची छेड काढणार्या रिक्षाचालकाला चोप
written By My Mahanagar Team
Bhayandar