भाईंदर : मीरा-भाईंदर येथून ठाण्याकडे जाताना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. गुजरात आणि उत्तर भारतातून येणारी अवजड वाहने या रस्त्यावर येत असल्याने कोंडीत भर पडते. त्यातून घोडबंदर फाउंटन ते घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यातून काही किलोमीटरच्या प्रवासासाठी वाहनांना तासन् तास कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे मीरा-भाईंदर ते ठाणे प्रवास जलद करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गायमुख ते भाईंदर या २० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामासाठी पाच कंपन्यांनी १० निविदा दाखल केल्या आहेत. या प्रकल्पाच्या कामासाठी एमएमआरडीएने जुलैमध्ये काढलेल्या निविदेला कंपन्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लवकरच कंत्राटदार अंतिम करून कामाला सुरुवात केली जाणार आहे. घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गायमुख ते भाईंदर हा १५.५ किमीचा मार्ग उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार भाईंदर ते फाउंटन हॉटेल, असा १० किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारला जाणार आहे. हा मार्ग दोन्ही दिशांच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी ४ लेनचा असेल. त्यासाठी सुमारे ८५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर फाउंटन हॉटेल ते गायमुख असा ५.५ किमीचा रस्ता उभारला जाणार आहे. त्यातील ३.५ किमीचा दुहेरी भुयारी मार्ग आहे. यात दोन्ही दिशांच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन स्वतंत्र बोगदे खोदले जातील. त्यापुढे सुमारे २ किमीचा उन्नत रस्ता असेल. त्यासाठी ११,५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ’एमएमआरडीए’ने १० किमीच्या उन्नत मार्गासाठी आणि फाउंटन हॉटेल ते गायमुख या ५.५ किमीच्या भुयारी मार्गासाठी स्वतंत्र निविदा काढल्या होत्या. या दोन्ही प्रकल्पांसाठी प्रत्येकी पाच कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत.
प्रकल्पांसाठी कंपन्यांच्या निविदा
भाईंदर ते फाउंटन हॉटेल १० किमी लांबीचा उन्नत मार्ग – अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, एल अँड टी, मेघा इंजिनिअरिंग, नवयुगा इंजिनिअरिंग, ऋत्विक प्रोजेक्ट
फाउंटन हॉटेल ते गायमुख भुयारी आणि उन्नत मार्ग – अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, एल अँड टी, मेघा इंजिनिअरिंग, नवयुगा इंजिनिअरिंग, ऋत्विक प्रोजेक्ट