भाईंदर : मीरा- भाईंदर शहरात भाईंदर पश्चिमेला एकमेव एसटी आगार आहे, या एसटी आगारात प्रवाशी व कर्मचार्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. एसटी आगाराची इमारत जीर्ण व धोकादायक झाली आहे, कर्मचार्यांना भीतीच्या छायेखाली काम करावे लागत आहे. तसेच या ठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव प्रवासी आणि कर्मचारी दोघांनाही जाणवत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रवाशांसाठी बसण्याची सोय नाही आणि पिण्याच्या पाण्याचीही पुरेशी व्यवस्था नाही. कर्मचार्यांसाठी बांधलेल्या विश्रामगृहाची अवस्था एवढी वाईट आहे की, छत कधीही कोसळू शकते, स्वच्छतागृहे ही पूर्णत खराब आणि दयनीय अवस्थेत आहेत. त्यामुळे एकंदरीतच भाईंदर पश्चिमेच्या एसटी आगाराची दुरावस्था झाली आहे.
भाईंदर पश्चिमेला एसटी आगार फार जुने आहे, परंतु गेल्या अनेक वर्षापासून या आगारात असलेल्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या आगाराची जमीन काही मिठागर व सीआरझेड बाधित आहे. त्यामुळे आगाराची दुरूस्ती करता येत नसल्याचे सांगितले जात आहे. या आगारात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या कमी प्रमाणात सोडल्या जातात. त्यामुळे लांबचा प्रवास करणार्या प्रवाशांना एसटी पकडण्यासाठी शहराबाहेर ठाणे, मुंबई सेंट्रल व बोरिवली येथे जावे लागते. तर काही प्रमाणत गाड्या या आगारातून बाहेर जातात, त्या प्रवाशांना देखील असुविधांचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या एसटी बसेस व कर्मचार्यांना थांबण्यासाठी समाधानकारक सुविधा उपलब्ध नाही. कर्मचारी, चालक, वाहक यांना विश्रांती कक्ष नसल्यामुळे त्यांना एसटी बसमध्येच रात्र काढावी लागत आहे. दुपारी तीननंतर एसटी आगारात कर्मचारी उपलब्ध नसल्याचा आरोप एसटी प्रवाशांनी केला आहे. चौकशीसाठी येणार्या प्रवाशांना देखील पुरेशी माहिती मिळत नाही. स्थानिक नागरिक आणि स्थलांतरित संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. प्रशासनाने तातडीने एसटी आगाराच्या दुरुस्तीकडे लक्ष देऊन प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास प्रवासी आणि कर्मचार्यांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने तातडीने पावले उचलून आगाराच्या दुरुस्तीचे काम मार्गी लावण्याची गरज आहे.