घरपालघरडॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे रविवारी भूमिपूजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे रविवारी भूमिपूजन

Subscribe

या भवनासाठी एकूण २७ कोटी निधी खर्च होणार आहे. त्यातील १५ कोटी राज्य सरकार , १ कोटी आमदार निधी तसेच ११ कोटी मीरा- भाईंदर महापालिका असे २७ कोटी रुपये खर्च करून हे भवन तयार होणार आहे , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.

मीरा भाईंदर:  शहरात ’भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन’ उभे राहणार असून या भवनाचे रविवार २० नोव्हेंबर रोजी भूमिपूजन होणार आहे. जवळपास २७ कोटी रुपये खर्च करून हे बहुउद्देशीय भवन उभे राहणार असून भूमिपूजन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रिपब्लिकन सेना अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात पुढील कार्यक्रम होणार आहे. तेथे प्रसिद्ध मराठी गायक नंदेश उमप यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. अत्यंत कलात्मक पद्धतीने हे भवन तयार केले जाणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभे राहणारे हे भवन राज्यातील पहिले बहुउद्देशीय भवन ठरणार आहे , असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या ’भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने’अंतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मौजे घोडबंदर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन , विपश्यना केंद्र , बहुउद्देशीय केंद्र बांधणे या कामास राज्य सरकारने मंजुरी देत त्याचा शासन निर्णय ही प्रसिद्ध केला. आता त्या कामांत आणखी काही कामांचा समावेश करण्यात आला आहे. या भवनासाठी एकूण २७ कोटी निधी खर्च होणार आहे. त्यातील १५ कोटी राज्य सरकार , १ कोटी आमदार निधी तसेच ११ कोटी मीरा- भाईंदर महापालिका असे २७ कोटी रुपये खर्च करून हे भवन तयार होणार आहे , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.

 

- Advertisement -

असे असेल सांस्कृतिक भवन
मीरारोड येथे न्यायालय इमारतीच्या शेजारीच हे सांस्कृतिक भवन उभे राहणार आहे. या सांस्कृतिक भवन इमारतीमध्ये मंगल कार्यालय म्हणजेच मंगल कार्य होण्यासाठी मोठा हॉल , विपश्यना हॉल , प्रदर्शन हॉल , ग्रंथालय , मिनी थिएटर , कॉन्फरन्स रूम , कॅफे एरिया , लिफ्ट अशा सर्व सुविधा असतील. राज्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते-कार्यकर्ते जर मीरा भाईंदर शहरात आले तर त्यांच्या विश्रामाची व्यवस्थाही भवनात केली जाईल. त्याचप्रमाणे या आंबेडकर भवनाच्या प्रांगणात पाच फूट उंचीच्या चबुतर्‍यावर , १० फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची नागरिकांची मागणीही आमदार प्रताप सरनाईक यांनी मान्य करत प्रशासनाला त्या कामाचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे याच सांस्कृतिक भवनात स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रही सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -