व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडसाठी भाजपचा आंदोलनाचा इशारा

पालघरमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन प्रशासनाने व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नगरसेवक अरुण माने यांनी दिला आहे.

Center for 25 ICUs and 75 Oxygen Beds at Vikhroli
प्रातिनिधीक फोटो

पालघरमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन प्रशासनाने व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नगरसेवक अरुण माने यांनी दिला आहे. पालघर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची संख्या दररोज तीनशेच्यावर गेली आहे. त्यामुळे बेड, व्हेंटिलेटरही कमी पडू लागले असून, एकूणच आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढलेला आहे. त्यामुळे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू लागलेल्या पालघर जिल्ह्यात आयसीयू बेड, जीवनरक्षक प्रणाली बेडची मागणी देखील वाढली आहे. पालघर शहरातील सरकारी रुग्णालयात ही आयसीयू बेड, जीवनरक्षक प्रणाली बेडची सोय करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पालघर शहर भाजपच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून पालघर जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील गरीब रूग्णांची उपचारासाठी कोणतीही सोय नाही, या कोरोनाच्या महामारीत पालघर येथील गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. आज कोरोनांमुळे आजूबाजूच्या गावातील, पाड्यातील गरीब रुग्ण उपचारासाठी प्रथम पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात येतो. परंतु काही रुग्णांना आयसीयू किंवा व्हेंटिलेटरची गरज असते. अशावेळी गरीब रूग्णांची अवस्था अतिशय वाईट होऊन जाते. अशातच काही रुग्णांचा मृत्युदेखील होत आहे. गेल्या वर्षभरांपासून बहुतेक लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे सामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली आहे. अशा गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्यासाठी पैसे नसतात, व एका दिवसाचे बिल ८ ते १० हजार असल्याने ते भरू शकत नाही, याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

गेल्यावर्षी पीएम केअरकडून सरकारी दवाखान्यात जीवनरक्षक प्रणालीचे (व्हेंटिलेटर) काही संच देण्यात आले होते. पण ते कधीही सुरू केले नाहीत. ते सुरू करण्यासाठी तज्ञ नसल्याकारणाने अजून सुरू केले नाही, असे सांगण्यात आले. तसेच जीवनरक्षक प्रणाली आजूबाजूच्या सरकारी व खासगी रुग्णालयात देण्यात आली आहेत, असा आरोपही करण्यात आला आहे. येत्या १५ मे पर्यंत पालघर ग्रामीण रुग्णालयात आयसीयू व व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करावी. जर व्यवस्था केली नाहीतर भाजप रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल व कायदा सुव्यवस्थेची पूर्ण जबाबदारी सरकारची राहील. याची नोंद घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा –

शूssss! मेहता साहेब On Duty!