घरपालघरबियाणे, खतांच्या विक्रीत काळाबाजार; खासदार, आमदार आक्रमक

बियाणे, खतांच्या विक्रीत काळाबाजार; खासदार, आमदार आक्रमक

Subscribe

पालघर जिल्ह्यात बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर प्रथम कारवाई करण्याची मागणी आमदार मनीषा चौधरी यांनी केली आहे.

पालघर जिल्ह्यात बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर प्रथम कारवाई करण्याची मागणी आमदार मनीषा चौधरी यांनी केली आहे. अशीच मागणी खासदार राजेंद्र गावीत यांनीही केली आहे. तर काळाबाजार प्रकरणी आमदार चौधरी यांनी सभागृहात लक्षवेधीही केली होती. जिल्हा कृषी विभागाने नियोजित दरापेक्षा अधिक दराने बियाणे तसेच खतांची विक्री केल्याच्या तक्रारी येण्याची वाट न पाहता, जिल्हा भरारी पथकामार्फत विक्री केंद्रांच्या दुकानांवर नियंत्रण ठेंवण्याचे निर्देश दिले आहेत. लवकरच पावसाळी खरीप हंगाम सुरू होणार आहे. या हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, किटकनाशके यांच्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी अधीक्षक यांनी शेतकऱ्यांना किंमतीपेक्षा जादा दाराने बियाणे व खताची विक्री करणाऱ्या दुकानांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी खासदार राजेंद्र गावीत यांनी केली आहे.

खते, बी-बियाणे आणि किटकनाशके यासंदर्भात काही अडचणी असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या तक्रारींचे निरसन करून घ्यावे. तालुकास्तरावर शेतकऱ्यांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरावरील पुढील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी.
– काशिनाथ तरक्षे, जिल्हा कृषी अधीक्षक

- Advertisement -

कोणत्याही कृषी सेवा केंद्रांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने बियाणे, खताची विक्री, खत उपलब्ध असूनही देण्यास नकार देणे, पक्के बिल न देणे, खरेदी पावती न देणे, मुदतबाह्य बियाण्यांची विक्री करणे आदी प्रकारच्या तक्रारी आल्यास तत्काळ कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्याची मागणी खासदार राजेंद्र गावित आणि आमदार मनीषा चौधरी यांनी केली आहे.

खरेदी केलेल्या बियाण्याचे वेस्टन, पिशवी, टॅग, खरेदी पावती व त्यातील थोडे बियाणे पीक कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. खरेदी केलेले बियाणे त्याच हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. तसेच बियाण्याची गुणवत्ता व दर्जा याची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करा. बियाणे खरेदीची पक्की पावती, त्यावर बियाण्याचा संपूर्ण तपशील जसे पीक वाण, संपूर्ण लॉट नंबर, कंपनीचे नाव, खरेदीदाराचे नाव, पत्ता, सही, विक्रेत्याचे नाव व पत्ता, सही याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक काशिनाथ तरक्षे यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

कसार्‍याजवळ धावत्या गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बाळाचा जन्म

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -