जव्हारमधील रेशन दुकानातील धान्याची काळाबाजारात विक्री

जव्हार तालुक्यातील खडखड येथील रेशनदुकानदाराला रेशन दुकानात विकण्यासाठी आलेले धान्य काळ्याबाजारात नेत असताना गावक-यांनी रंगेहाथ पकडले.

जव्हार तालुक्यातील खडखड येथील रेशनदुकानदाराला रेशन दुकानात विकण्यासाठी आलेले धान्य काळ्याबाजारात नेत असताना गावक-यांनी रंगेहाथ पकडले. मात्र, संधी मिळताच दुकानदार आणि टेम्पो चालक धान्य घेऊन पसार झाले. कोरोना काळात शासनाकडून अंत्योदय, प्राधान्य कुटुंबांना आणि केशरी रेशनकार्ड धारकांना तांदूळ, गहू, सरकारकडून मोफत दिले जात आहे. मात्र, जव्हारमधील खडखड येथील रेशन दुकानदार वाय. के. घाटाळ याने गरीब कुटुबांना धान्य न देता ते काळया बाजारात विक्रीसाठी नेताना, येथील गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले. यावेळी त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केले. ही बाब लक्षात येताच दुकानमालक आणि टेम्पो चालक धान्य घेऊन फरार झाले. याघटनेनंतर गावकऱ्यांनी तहसिलदारांची भेट घेऊन दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.

जव्हारमधील खडखड गावातील रेशन दुकानदाराकडे खडखड, खरवंद, ठाकरपाडा, तांबडमाळ अशा चार गावांचे रेशनिंग धान्य दुकान आहे. कोरोना काळात आदिवासी, गरीब, शेतमजूर यांची उपासमार होऊ नये म्हणून, शासन अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि केशरी रेशनिंग कार्डधारक कुटुबांना माणसी ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू मोफत देत आहे. मात्र, येथील दुकानदार हा महिन्याच्या शेवटी केवळ दोन दिवस धान्य वाटप करतो. त्यानंतर आलेल्या लाभार्थ्यांना धान्य देत नाही. गरीब कुटुंबाचे धान्य तो काळा बाजारात विक्री करत होता. त्यामुळे येथील सुजान नागरिकांनी पाळत ठेवून, काळा बाजारात टेम्पोतून धान्य विक्रीसाठी नेताना पकडले. मात्र, संधी साधून चपळाई करत टेम्पो चालक धान्य घेऊन फरार झाला. या घटनेचा प्रकार एका ग्रामस्थांने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

आमच्या गावातील रेशनिंग दुकानदार दर महिन्याला खासगी पिकअप अथवा टेम्पोत तांदूळ, गहू भरून धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी पाठवतो. आम्ही दोनच दिवसापूर्वी हा घडलेला प्रकार समोर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला विरोध करून टेम्पो चालक पळून गेला. त्याचा पुरावा आम्ही दिला असून चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे.
– दामू घाटाळ, ग्रामस्थ, खडखड

यानंतर घटनेची माहिती आणि तक्रार देण्यासाठी गावकऱ्यांनी थेट तहसिलदार आणि प्रांत कार्यालय गाठले. दुकानदाराविरोधात लेखी तक्रार देत दुकानाचा परवाना रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या तक्रारींची दखल घेत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुशी सिंग यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशीचे आदेश दिले. सिंग यांच्या आदेशानुसार पुरवठा अधिकारी, पुरवठा निरीक्षक, तलाठी यांनी रेशन दुकानाची पाहणी केली. त्यावेळी दप्तर पाहणी केल्यानंतर त्यांना १६ किलो धान्य आढळले. परंतु गावकऱ्यांनी पुरवठा निरीक्षक यांना घराची पाहणी करायला लावली असता, भात भरून ठेवण्याच्या कणग्यात १० पोते भरलेले तांदूळ आढळून आले. पुरवठा अधिकाऱ्यांना पंचनामा करून संबंधित दुकानदारावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.

मागीलवर्षी या दुकानदाराविरोधात गावकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर दुकानदाराने चूक झाल्याची कबुली दिली होती. तसेच त्याच्याकडून लेखी लिहूनही घेण्यात आले होते. त्यावेळी त्याला समज देण्यात आली होती. पण, आजही दुकानातून लाभार्थ्यांना वेळेवर, नियमित धान्य मिळत नाही. धान्य देण्यात अडचण आणणे, लाभार्थ्यांची अडवणूक करणे, कमी धान्य देणे असे प्रकार दुकानदार करत आहे. त्यामुळे दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा –

जव्हार, मोखाडा तालुक्यात गवत विक्रीतून साधला जातोय रोजगार