वाडा: पंचायत राज व्यवस्थेतील महत्वाचे स्थान असलेल्या पंचायत समिती या विभागाच्या गटविकास अधिकार्याने मुख्यालयी वास्तव्यास राहावे म्हणून शासनाने शासकीय निवासस्थानाची निर्मिती केली आहे.मात्र या निवासस्थानी वाड्याचे गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खताळ हे राहत नसून त्यांचे वास्तव्य मनोरला असून तेथून ते ये जा करीत असतात.
वाडा हे पालघर व ठाणे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून तालुक्याचे मुख्यालय आहे.पंचायत समिती स्तरावरुन ग्रामविकासाच्या अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता गटविकास अधिकार्याने मुख्यालयी राहावे याकरिता शासकीय निवासस्थान आहे. यापूर्वीचे गटविकास अधिकारी या निवासस्थानाचा आपल्या वास्तव्याकरिता वापर करीत असत.मात्र एका वर्षापूर्वी गटविकास अधिकारी खताळ यांनी या पदाचा कार्यभार घेतल्यापासून ते शासकीय निवासस्थानी राहत नाहीत. हजर झाल्यापासून मुख्यालयी न राहता ते मनोर येथून ये जा करत आहेत. त्यामुळे मुख्यालयी राहण्याच्या शासनाच्या नियमांची त्यांनी पायमल्ली केल्याचे दिसून येत आहे.
वाडा पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी शासकीय निवासस्थाने आहेत. गटविकास अधिकारी यांच्यासाठीही शासकीय निवासस्थान आहे. मात्र ते तिथे न राहता मनोर येथून राहत असून ये जा करीत असतात, दरम्यान, गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खताळ हे शासकीय निवासस्थानी राहत नसल्याने पंचायत समितीचे इतर अधिकारी व कर्मचारी तरी कोणता आदर्श घेऊन मुख्यालयी राहतील असा सवाल उपस्थित केला जात आहे.यासंदर्भात वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खताळ यांच्याशी संपर्क साधला असता माझी विनंती बदली झाली असून पती- पत्नी एकत्रीकरण हा शासनाचा नियम असून त्यानुसार आम्ही एकत्र राहत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
नुकताच झालेल्या स्वातंत्र्य दिन सोहळयासही गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खताळ हे उशीरा उपस्थित राहिल्याने पंचायत समितीच्या पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पदाधिकार्यांनी केली आहे.
गटविकास अधिकारी खताळ हे निवासस्थानी राहत नसल्याने विकासकामे खोळंबली आहेत.त्यासंदर्भात पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेवून त्यांच्याकडे तक्रार करणार आहोत.
-अस्मिता लहांगे
सभापती
पंचायत समिती वाडा