मोखाडा: धुळवडीच्या दिवशी श्री गणेशाचे पहिले सोंग काढून मोखाडातील बोहाडा उत्सवाला सुरुवात होते. त्यानंतर जवळपास सात दिवस विविध देवी,देवता यांचे मुखवटे परिधान करून अगदी पारंपरिक वाद्यांच्या साथीने पांढरपेशी व आदिवासी समाज एकत्र येऊन गुण्यागोविंदाने बोहाडा उत्सव साजरा करतात.या उत्सवासाठी बाहेरगावी नोकरीसाठी गेलेले चाकरमानी व माहिरवाशीन आपल्या गावाकडे परत येऊन आपला आनंद द्विगुणित करतात.
अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा मोखाडातील बोहाड्याला चारशे वर्षांची परंपरा असल्याचे जाणकार सांगतात. पूर्वी पासून ठराविक घराण्याकडे विविध देवी देवता यांचे मुखवटे असलेली सोंग वाटून दिलेली आहेत. त्यांनी त्या सोगांची रंगरंगोटी ते सोंग नाचवण्यापर्यत सर्व बघायचे.बोहाडा उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते जगदंबा मातेची सकाळी निघणार्या मिरवणुकीत लाखो भाविक मोखाडा नगरीत जगदंबा मातेच्या दर्शनासाठी येतात. महत्त्वाचे म्हणजे मोखाडा तालुक्यात शासकीय कार्यालयात नोकरी करुन गेलेले अधिकारी देखील या दिवसी आपली उपस्थिती लावतात हे विशेष आहे.
बॉक्स
पोलिसांची कृती कौतुकास्पद
मोखाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप गिते यांनी बोहाडा उत्सवाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त तर ठेवला. परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचे ठरले ते म्हणजे त्यांनी बोहाडा हा केवळ श्रध्दा, आनंदा पुरता मर्यादित न ठेवता बोहाडा उत्सवावेळी बेटी पढाओ,देश बढाओ, कमी वयात लग्न टाळा असे समाज उपयोगी संदेश प्रत्येक सोगांच्या सोबत फिरत असताना फलक लावून दिले. त्यामुळे त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे.