बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण आग लागली.या आगीत तीन कंपन्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. प्रथमतः यु के आरोमॅटिकस कंपनीला आग लागली. हवेचा जोर जास्त असल्याने आग पसरली.तसेच श्री.केमिकल्स ,आदर्श टेक्स्टाईल अशा तीन कंपन्यांना आग लागली.यातील दोन कंपन्या बंद असल्याने जीवीतहानी झाली नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तारापूर औद्योगिक वसाहतींमधील प्लॉट क्र. के – ६/७ वरील कारखान्यांना रविवार(ता.29) संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.
कंपनीत मोठी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सुरुवातीला बोईसर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पाठवण्यात आल्यानंतर पुन्हा एक गाडीला अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वाढत जात असल्याने डहाणू अदानी पावर लिमिटेड १, तारापूर औद्योगिक वसाहत, भाभा अणूशक्ती केंद्र व पालघर नगरपरिषद १ अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते, अशी माहिती बोईसर अग्निशामक दलाकडून मिळाली. अपघातस्थळी पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा अधिक तपास बोईसर पोलीस करत आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
तारापूर औद्योगिक क्षेत्रात १४०० हून अधिक कारखाने आहेत. त्यापैकी ५०१ कारखाने घातक रसायनांचे उत्पादन घेतात. यातील ३५ हून अधिक कंपन्या अतिघातक विभागात मोडतात. पण, त्यानंतरही एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय येथे होत असलेल्या अपघातांकडे तितक्या गंभीरपणे पाहत नसल्याने कामगारांच्या जीवावर बेतत आहे. येथे अधिकतर कामगार कंत्राटी पद्धतीवर भरती केले जातात. त्यातही बहुतांश कंत्राटी कामगार महाराष्ट्राबाहेरील विशेषतः युपी आणि बिहार राज्यातील आहेत.अनेकदा स्फोट आणि आगीत दगावलेल्या अथवा जखमी झालेल्या कामगारांची खरी संख्या लपवण्याचेही प्रकार घडताना दिसतात. धक्कादायक बाब म्हणजे बोईसर-तारापूर परिसरात ५०० हून अधिक रासायनिक कारखाने असताना, याभागात स्फोट आणि आगीच्या घटना वारंवार घडत असताना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे कार्यालय मात्र दूरवर कार्यरत आहे. औद्योगिक सुरक्षा, सुरक्षा नियमांची कठोरपणे अंमलबजावणी, प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आदी बाबींकडे सरकारी यंत्रणांचे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत.