मनोर: मतदान संपले असून बोईसर विधानसभा मतदार संघातील सहा उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. सुरुवातीला धिम्या गतीने सुरु झालेल्या मतदानाने दुपारी वेग धरला होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 60.4 टक्के मतदान पार पडले होते. दरम्यान संपूर्ण विधानसभा मतदार संघात कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले.किरकोळ अपवाद वगळता इव्हीएम मशीन बंद पडण्याची घटना घडली नाही.
बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून धिम्या गतीने मतदानास सुरुवात झाली होती.सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या दोन तासात 6.97 टक्के मतदान झाले होते.नऊ वाजल्यानंतर मतदार घराबाहेर पडल्यामुळे मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अकरा वाजेपर्यंत पर्यंत 19.91% टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासांत मतदानाची टक्केवारी 32.05 पर्यंत पोहोचली होती.दुपारी तीन वाजता मतदानाच्या टक्केवारीने 47.36 चा आकडा पार केला होता.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत 60.4 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता, मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदारांनी मतदान केंद्रांबाहेर रांगा लावल्या होत्या.सायंकाळी मतदानाची वेळ सहा वाजे पर्यंत अंदाजे 65 टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.