अनधिकृत भंगार गोदामांमुळे बोईसरकर त्रस्त

त्याचप्रमाणे याठिकाणी केमिकलचे ड्रम साफ करून त्याचे घातक सांडपाणी कोणतीही आवश्यक प्रक्रिया न करताच तसेच गटारात सोडण्यात येत असल्यामुळे शेजारील रहिवासी वस्तीत राहणार्‍या नागरीकांना तीव्र रासायनिक दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

वाणगाव :  बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीलगत अवधनगर भागात थाटलेल्या अनधिकृत भंगाराच्या गोदामांमुळे परिसरातील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सरकारी जागांवर अतिक्रमण करून उभारलेल्या या गोदामांविरोधात असंख्य तक्रारी करून देखील कारवाई होत नसल्याने नागरीक त्रस्त आहेत. तारापूर-बोईसर औद्योगिक परिसरातील सरावली ग्रामपंचायतअंतर्गत अवधनगर,आझाद नगर,धोडीपूजा या रहिवासी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार व्यावसायिक आणि विक्रेते यांनी गोदामे थाटली आहेत. या गोदामांमध्ये तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून बाहेर निघणारे भंगार साहित्य आणि घातक केमिकलचे ड्रम यांची बेकायदेशीर साठवणूक केली जाते. महाराष्ट्र सरकारच्या जागेवर उभारलेल्या आपल्या अनधिकृत गोदामांसाठी भंगार व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकारे पालघर महसूल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर यांची परवानगी न घेताच सदर जागी पर्यावरण आणि मानवी जीवनास घातक अशा साहित्याची साठवणूक केल्यामुळे अनेकवेळा आगी लागण्याच्या घटना घडत असून भविष्यात मोठी दुर्घटना होऊन संपूर्ण रहिवासी परिसर बेचिराख होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी केमिकलचे ड्रम साफ करून त्याचे घातक सांडपाणी कोणतीही आवश्यक प्रक्रिया न करताच तसेच गटारात सोडण्यात येत असल्यामुळे शेजारील रहिवासी वस्तीत राहणार्‍या नागरीकांना तीव्र रासायनिक दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

यासर्व प्रकारामुळे याठिकाणी प्रचंड अस्वच्छता निर्माण होऊन परिसराला बकाल रूप आले आहे. त्यातूनच येथील रहिवासी आणि लहान मुले यांना उलटी,डोळ्यांची जळजळ,डोकेदुखी,श्वास घ्यायला त्रास,पोटदुखी,जुलाबसारखे आजार वारंवार उद्भवत आहेत. या अनधिकृत भंगार गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात तारापूर औद्योगिक वसाहतीमधून चोरीचे भंगार आणून त्याची विक्री केली जाते. त्यासाठी या परिसरात भंगार माफीयांच्या अनेक टोळ्या कार्यरत असून यामध्ये महिन्याकाठी करोडो रुपयांचा व्यवहार केला जातो. भंगार विक्रीच्या व्यावसायिक स्पर्धेतून या टोळ्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडून अनेकवेळा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती देखील निर्माण होते. पोलीस आणि राजकीय पुढार्‍यांचे पाठबळ असल्यामुळेच कारवाई होत नसल्याचा आरोप रहिवासी करीत
आहेत.