घर पालघर आधुनिक शेतीसाठी कर्जदार झाले, किसान सन्मान योजनेने अपात्र केले

आधुनिक शेतीसाठी कर्जदार झाले, किसान सन्मान योजनेने अपात्र केले

Subscribe

ही अवजारे घेताना उत्पन्नाचा मार्ग दाखविण्यासाठी बँकांमध्ये सादर केलेल्या आय.टी. फाईलमुळे या शेतकर्‍यांना शासनाच्या किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागले आहे.

वाडा:  न परवडणारा झालेला भातशेती व्यवसाय यापुढे टिकवायचा असलेल तर पारंपरिक या व्यवसायात बदल करून आधुनिक यांत्रिकीकरण करण्याची आवश्यकता आहे, असे शासन, प्रशासनाकडून सांगितले गेले. अनेक शेतकर्‍यांनी उत्पन्न कराची फाईल (आय.टी. फाईल) बनवून बँकांकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर, भात लावणी, कापणी, झोडणी अशी अवजारे खरेदी केली. मात्र या सर्व कर्जदार शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभाला मुकावे लागले आहे.पालघर जिल्ह्यात असे तीन हजारांवर शेतकरी असून त्यांना सुरूवातीला एक -दोन वर्षे या योजनेचा लाभ मिळाला. त्यानंतर मात्र शासनाने आपण करदाते असल्याने आपणास या योजनेचा लाभ बंद करण्यात आला असून आतापर्यंत या योजनेतून घेतलेल्या लाभाची रक्कम परत करावी, अशा प्रकारचे सूचना पत्र (नोटीस) देण्यात आली आहे.
शेतकर्‍यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी डिसेंबर 2018 पासुन प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरु करण्यात आली. करदाते शेतकरी , शासकीय सेवेत असलेले तसेच पेन्शन धारक शेतकरी यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. निव्वळ शेती व्यवसायावर अवलंबून असणारा शेतकरी व आधुनिक शेतीची कास धरलेल्या शेतकर्‍यांनी यांत्रिक अवजारांचा वापर करण्यासाठी कर्ज घेऊन अवजारे खरेदी केली. ही अवजारे घेताना उत्पन्नाचा मार्ग दाखविण्यासाठी बँकांमध्ये सादर केलेल्या आय.टी. फाईलमुळे या शेतकर्‍यांना शासनाच्या किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागले आहे.

प्रतिवर्षी सहा हजारांचा लाभ
या योजनेअंतर्गत असलेल्या लाभार्थी शेतकर्‍यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांचा निधी दिला जातो. चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात. पालघर जिल्ह्यात असे 1 लाख 58 हजार 425 लाभार्थी आहेत. तर शेती व्यतिरिक्त कुठलाही व्यवसाय, नोकरी न करणारे तीन हजारांहून अधिक शेतकरी (कर्जदार) करदाते ठरविल्याने त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

1) यांत्रिक शेतीसाठी आम्ही आय.टी. फाईल देऊन कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केले, हाच आमचा किसान सन्मान योजनेपासून अपात्र ठरण्याचा गुन्हा झाला.
– कांतीकुमार शेलार – करदाता शेतकरी, घोडमाळ, ता. वाडा

- Advertisement -

2)अपात्र ठरविण्यात आलेले अनेक शेतकरी करदाते नाहीत. अथवा सरकारी, निमसरकारी नोकरीत नसतानाही त्यांना अपात्र ठरवून त्यांचा सन्मान न करता अपमानित केले आहे.

-पराग पष्टे – अध्यक्ष, किसान सभा, महाराष्ट्र प्रदेश.
&……………………………………………………………………

- Advertisment -