मीरा रोड परिसरात उद्याने, मैदानांना बिल्डरांनी ठोकले टाळे

काँग्रेसने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्याने महापालिका आयुक्तांनी उद्याने आणि मैदाने नागरिकांसाठी खुली करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मीरा रोड परिसरातील २० उद्याने, चार मैदानांना बिल्डरांनी टाळे ठोकल्याचा प्रकार उजेडात आला. त्यानंतर काँग्रेसने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्याने महापालिका आयुक्तांनी उद्याने आणि मैदाने नागरिकांसाठी खुली करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मीरारोड येथील शांती पार्क व शांती नगर गृहसंकुलातील आर. जी. जागेवरील २० उद्याने, ४ मैदाने यांची देखभाल व दुरुस्तीबाबतचा करार महापालिका प्रशासनाने रद्द केला आहे. त्यानंतर १ डिसेंबरपासून सर्व उद्यानांना टाळे लावून बिल्डरने आपल्या ताब्यात घेतल्याने जनतेचा रोष वाढला होता.

अचानक उद्याने कुलूपबंद झाल्याने येथील नागरिकही अचंबित झाले होते. त्यामुळे रहिवाशांनी नाराजी व्यक्त करत सत्ताधारी भाजप नगरसेवकांना लक्ष केले होते. बिल्डरशी हितसंबंध असल्यानेच भाजपचे स्थानिक नगरसेवक मूग गिळून गप्प बसल्याने अखेर याप्रश्नी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी हाती घेतला. काँग्रेसने आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेऊन लोकांचा रोष त्यांच्या कानी घेतला. तसेच वेळप्रसंगी आंदोलनाचा इशाराही दिला. याची दखल घेत आयुक्तांनी सर्व उद्याने, मैदाने दोन दिवसात नागरीकांसाठी खुली करण्याचे आदेश बिल्डरसह संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पूर्वीप्रमाणेच इतर सेवासुविधा पूर्ववत चालू ठेवण्यासाठी महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत व उद्यान अधीक्षक यांना निर्देश दिले. तसेच  सर्व उद्यानांना येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष भेटी देऊन बिल्डरच्या ताब्यातून उद्याने मोकळी झाली आहेत किंवा नाहीत याची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक अनिल सावंत, एस. ए. खान, गीता परदेशी, प्रवक्ते प्रकाश नागणे आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा –

Video: सगळंच संपलय! माझे वडील हिरो होते, ब्रिगेडियर LS Lidder यांच्या मुलीची प्रतिक्रिया