मोखाडा: विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणलेले असले तरी सुद्धा आजही ग्रामीण भागातील कुटुंबे आधुनिकतेच्या सोबतच पारंपरिक कलेचा वारसा टिकवून बांबू, साग, शिसव या झाडापासून टोपली, सुप, इरले, कनगे, जात्याच्या कडा, बैलगाडीचे आरे, तसेच अनेक शोभिवंत वस्तूंचा वापर दैनंदिन जीवनात सर्रासपणे करत आहेत.परंतु प्लास्टिकच्या स्वस्तात बनवलेल्या वस्तूंनी बाजारपेठेत शिरकाव केलेला असल्याने लाकडापासून व बांबू पासून वस्तू बनवणार्या कारागिरांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली असून ग्रामीण भागातील बुरुड कारागीरांनी आपले व्यवसाय हळूहळू बंद करायला घेतले आहेत.
जव्हार ,मोखाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांबू,साग लागवड करण्यात आलेली असून या बांबूचा व सागाचा वापर शोभिवंत व गरजेच्या वस्तू बनविण्यासाठी केला जात आहे.जरी आधुनिकतेच्या काळात नव नवीन प्लास्टिकच्या वस्तू बाजारात उपलब्ध झालेल्या असल्या तरी देखील लाकडी वस्तूंनी सुध्दा आपली सुबकता बाजारात टिकवून ठेवली आहे.सण उत्सवाच्या काळात प्लास्टिक वस्तूंच्या बरोबरच लाकडापासून बनवलेल्या वस्तूंना सुध्दा अधिक मागणी आहे.ग्रामीण भागात लाकडापासून कोरीव शिल्प करणारे कारागीर व बुरुड कलाकार यांनी तयार केलेली टोपल्या, टारले, सुप, इरले, कनगे आदींसह लाकडापासून सोफा, बॉक्स पलंग, जनावरांचे लाकडी मुखवटे आदी सुबक वस्तू आजही बाजारात उपलब्ध होत आहेत.परंतु, वस्तू बनविण्यासाठी लागणार्या लाकडांचा तुटवडा, वेळखाऊ प्रक्रिया तसेच मेहनत जास्त कामाचा मोबदला कमी यामुळे ग्रामीण भागातील बुरुड कलाकार, कोरीव शिल्प कारागीर यांनी आपले व्यवसाय हळूहळू बंद करून इतर व्यवसायाकडे आपला मोर्चा वळवला आहे. तर दिवसेंदिवस मानवापासून पर्यावरणाचा र्हास होत असल्याने साग, बांबू, शिसव यांची वने लुप्त होत चालली आहेत. त्यामुळे वनविभाग सुध्दा साग, शिसव,बांबू तोडायला परवानगी देत नाही. म्हणून ग्रामीण भागातील कारागिरांच्या उद्योगांना उतरती कळा लागली आहे.
बॉक्स
पूर्वी खेडोपाडी हस्तकलेच्या वस्तू बनविणारी एक पिढी कायम काम करत होती. या वस्तूंना खेड्यातच नव्हे शहरात देखील मोठ्या प्रमाणात मागणी होती. परंतु काळानुरूप प्लास्टिक कंपन्यांनी या कारागिरांची जागा घेतल्याने ग्रामीण भागातील हस्तकलेच्या वस्तू निर्मिती करणारे कारागीर बेकार झाले. शेवटी आपले पूर्वीचा व्यवसाय बंद करून नवीन कामधंदा सुरू कराला लागला.